दारू पिण्याच्या कारणावरून वाद; पेट्रोल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न

दारू पिण्याच्या कारणावरून वाद; पेट्रोल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे (रफिक शेख) : दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकाच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. गुन्हा केल्यानंतर आरोपी बिहार या त्याच्या मूळगावी पळून जाण्याचा तयारीत होता. तत्पूर्वी पोलिसांनी त्याला अटक केली. गोविंदा ऊर्फ प्रेमकुमार यादव (वय ३३, रा. खोपडेनगर, कात्रज) असे त्याचे नाव आहे. ही घटना धनकवडी स्मशानभूमी परिसरात दि. ७ मार्च रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली. सूरज विजय मरळ (वय २८, धनकवडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मरळ आणि आरोपी यादव हे ओळखीचे आहेत. दारू पिताना मरळ याने यादवला शिवीगाळ केली. यामुळे चिडलेल्या यादवने त्याला मारहाण करीत अंगावर पेट्रोल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल. याप्रकरणी सहकारनगर पोलीस यादवच्या शोधात होते. यादरम्यान गुन्ह्यातील आरोपी यादव हा के. के. मार्केट येथे त्याच्या मित्राला भेटण्यासाठी येणार असून, त्यानंतर तो त्याच्या मूळगावी बिहारला पळून जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार सापळा रचून पोलिसांनी यादवला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उमेश लोंढे, पोलीस उपनिरीक्षक बापू कैंगरे, अंमलदार बापू खुटवड, सोपान नावडकर, अमोल गुरव, महादेव नाळे, भुजंग इंगळे, प्रदीप बेडीस्कर, सागर सुतकर, प्रवीण कोकणे, शिवा खेड यांच्या पथकाने केली आहे.

About The Author