आधार फाउंडेशनचे रुग्णशोध मोहिमेत महत्वपूर्ण योगदान – डॉ. शिवाजी फुलारी

आधार फाउंडेशनचे रुग्णशोध मोहिमेत महत्वपूर्ण योगदान - डॉ. शिवाजी फुलारी

लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील धनेगाव येथील आधार फाउंडेशनने शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या कुष्ठ रुग्ण व क्षय रुग्ण शोधमोहिमेची जनजागृती करण्याबरोबरच २१ प्रशिक्षित स्वयंसेवकांच्या मदतीने लातूर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात रुग्णांचा शोध घेऊन औषधोपचार करण्यास सहकार्य केले. आधार फाउंडेशनच्या महत्वपूर्ण योगदानामुळे ही रुग्णशोध मोहीम गतिमान होऊन यशस्वी झाली, असे गौरवोद्गार जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. शिवाजी फुलारी यांनी लातूर शहरातील बरकत नगर येथे रुग्णशोध मोहीमेच्या पाहणी दरम्यान केले.

शासनाच्या वतीने १ डिसेंबर ते १६ डिसेंबरदरम्यान कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण संयुक्त शोधमोहीम राबविण्यात आली. या रुग्ण शोधमोहिमेची नुकतीच यशस्वी सांगता झाली. यावेळी जिल्हा वैद्यकीय अधिकारी (कुष्ठरोग), डॉ. राहुल आनेराव, फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण पाटील,अवैद्यकीय पर्यवेक्षक (कुष्ठरोग) आर.पी.केंद्रे, आशा कार्यकर्ती दिपा कांबळे, मोहीमेतील स्वयंसेवक संभाजी कांबळे, महेश मुंढे, ऋषिकेश पवार, पृथ्वीराज वाघमारे, आकाश झिरमिरे यांच्यासह अनेक स्वयंसेवक उपस्थित होते.

लातूर महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे, आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. हेमंतकुमार बोरसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आधार फाउंडेशनने क्षय व कुष्ठरोग आजारांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने माहितीपत्रके तयार करुन सार्वजनिक ठिकाणी लावली. तसेच प्रशिक्षित स्वयंसेवकांच्या माध्यमातून लातूर महानगरपालिका क्षेत्रात आशा कार्यकर्तीं समवेत घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करून संशयित रुग्णांचे निदान करून औषधोपचार करण्यात आले.शोधमोहिमेतील ऊर्वरीत संशयीतांचे निदान डिसेंबर अखेर पर्यंत करण्यात येणार आहे.
आधार फाउंडेशनच्या सक्रीय योगदानामुळे शासनाच्या माध्यमातून राबविण्यात आलेली रुग्णशोध मोहीम सुकर आणि जलद गतीने पूर्ण झाल्याचे सांगून लातूरचे जिल्हा वैद्यकीय कुष्ठरोग अधिकारी डॉ. राहुल आनेराव यांनी फाउंडेशनचे कौतूक केले.
फाउंडेशनने यापूर्वीही शासनाच्या अशा शोधमोहिमेत उल्लेखनीय सहभाग नोंदवला असून शासनाचा उपक्रम अधिकाधिक गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे काम केले आहे. कोविड आपत्ती व टाळेबंदीच्या काळातही फाउंडेशनने महत्वपूर्ण कार्य केल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी सांगितले.

About The Author

error: Content is protected !!