सुनील केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली कुमठा (खुर्द) ग्रामपंचायत ठरली तालुक्यात अव्वल !
उदगीर (एल.पी. उगीले) राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा कुमठा खुर्द ग्रामपंचायतचे मार्गदर्शक सुनील भाऊ केंद्रे यांच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे सौ. वर्षाताई केंद्रे यांच्या कार्यकाळात कुमठा ग्रामपंचायत ने समाजाभिमुख आणि लोक कल्याणकारी योजना राबवत, उत्कृष्ट कार्याचा ठसा उमटवला आहे. या ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये भाग नोंदवला आणि उदगीर तालुक्यातील 87 ग्रामपंचायती मधून कुमठा (खुर्द) ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावत विकासाचा नवा इतिहास रचला आहे.
अशा उत्कृष्ट कामगिरीबद्दल उदगीर तालुक्यातून विकासाभिमुख कार्य करणाऱ्या सरपंच सौ. वर्षा सुनील केंद्रे, उपसरपंच ज्ञानेश्वर जीवनराव पाटील आणि ग्रामपंचायत अधिकारी संगमेश्वर बेलुरे यांच्या एकूण कार्याचा गौरव तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आपल्या गावातील लाभार्थ्यांना कशा मिळवता येतील? यासाठी अत्यंत प्रेरणादायी विचारातून सुनील केंद्रे यांनी गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात अहोरात्र मेहनत घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले आहेत, त्या प्रयत्नांची ही पावतीच म्हणावी लागेल. असे विचार अनेक जण व्यक्त करू लागले आहे.
गावात कोणताही गरीब किंवा श्रीमंत, लहान किंवा थोर किंवा जातीभेद न करता, सर्व नागरिकांच्या विकासाच्या संकल्पना प्रत्यक्षात राबवत असतानाच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गावाच्या विकासासाठी कसा करता येईल? यासाठी सरपंच सौ. वर्षाताई केंद्रे यांनी टोकाचे पाऊल उचलून प्रत्यक्ष काम करून दाखवले आहे .
कुमठा (खुर्द) गावाच्या एकूण विकास कामाची दखल घेत ग्रामपंचायत अधिकारी अवकाश पवार सोमनाथपूर तसेच आरसनाळ येथील ग्रामपंचायत अधिकारी संजय गुरमे आणि धडकनाळ बोरगाव येथील दाडगे या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनीही सहकार्य केल्याचे आवर्जून ग्रामपंचायत अधिकारी संगम बेलुरे यांनी सांगितले आहे.
गावाचा एकूण कायापालट होत असताना गावकऱ्यांनी दिलेली साथ, आणि अधिकारी वर्गांनीही केलेले योग्य मार्गदर्शन तसेच सुनील भाऊ केंद्रे यांनी शासनाच्या लोककल्याणकारी योजना गावात राबवल्या पाहिजेत यासाठी दिलेले मोलाचे योगदान, या सर्व गोष्टी विकास काम करायला प्रोत्साहन देणाऱ्या ठरल्याचेही ग्रामपंचायत अधिकारी संगम बेलुरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.
