निकोप मन स्वास्थ्यासाठी मनातील वाईट विचारांना हद्दपार करा – डॉ. मधुसूदन चेरेकर

निकोप मन स्वास्थ्यासाठी मनातील वाईट विचारांना हद्दपार करा - डॉ. मधुसूदन चेरेकर

अहमदपूर (गोविंद काळे) : आपल्याबद्दल कोणी कितीही वाईट विचार केला तरीही काही फरक पडत नाही, मात्र आपले मन आपल्या ताब्यात पाहिजे. दुसऱ्याच्या विपरीत वागण्याचा आपल्या मनावर परिणाम होऊ नये यासाठी व मन निकोप ठेवण्यासाठी आपल्या मनातील वाईट विचारांना हद्दपार करा, तरच तुम्हाला मनस्वास्थ्य लाभेल. असे प्रतिपादन येथील पतंजली योग पिठाचे प्रशिक्षक मेजर डॉ. मधुसूदन चेरेकर यांनी केले.

येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने ऑनलाइन विद्यार्थी प्रबोधन पंधरवडा आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आभासी तथा दूर दृश्य (झूम) प्रणालीद्वारे आयोजित व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प गुंफताना डॉ. चेरेकर हे बोलत होते. सदरील कार्यक्रम हा प्रजासत्ताक दिनी’ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते, तर उद्घाटक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. दीपक बच्चेवार हे उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना डॉ. चेरेकर म्हणाले की, भगवान बुद्धांनी मनाच्या अवस्थांचा अभ्यास करून सम्यक समाधी, सम्यक विचार, सम्यक काया, सम्यक व्यायाम आदी गोष्टींच्या माध्यमातून मन प्रसन्न करण्याची साधना सांगितलेली आहे. तसेच संत तुकारामांनीही “मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण ” असे म्हटले आहे. माणसाने सतत स्मितहास्य केले पाहिजे. आपल्याला मनाने हसता आले पाहिजे. डोळ्याने हसता आले पाहिजे आणि हसत-हसत जगता आले पाहिजे, असेही ते म्हणाले.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की , आजच्या धकाधकीच्या काळात माणूस आपले मनस्वास्थ्य हरवून बसला असून, मनाच्या मशागतीसाठी प्रत्येकाने वेळ देण्याची गरज आहे. मानसिक आरोग्यासाठी सकारात्मक विचार आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा संचालक प्रा. डाॅ. अभिजित मोरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. अनिल मुंडे यांनी केले. या ऑनलाईन व्याख्यानास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!