पत्नीला शिवीगाळ करत आत्महत्या करण्यास प्रवृत्त

पत्नीला शिवीगाळ करत आत्महत्या करण्यास प्रवृत्त

पुणे (प्रकाश इगवे) : ‘जेवण नीट करत नाही’, ‘सकाळी लवकर उठत नाही,’ या कारणावरून पत्नीला शिवीगाळ करत आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला न्यायालयाने १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. निकितकुमार जितेंद्र मलके (वय २६, रा. खराडी, मूळ रा. शहापूर, ता. इचलकरंजी) असे पोलीस कोठडी झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेच्या वडिलांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, महिलेचा पती, सासू, सासरा आणि दीराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २८ मार्च रोजी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास खराडी परिसरात घडली. सासरच्या मंडळींच्या सततच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली, असे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणात पोलिसांनी पतीला अटक करून न्यायालयात हजर केले. गुन्ह्याच्या तपासासाठी, तसेच अन्य आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील योगेश कदम यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

About The Author