सावत्र भावाने केला आपल्याच भावाचा खुन
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील तळेगाव येथे नळाचे पाणी भरण्याच्या कारणावरून दि 25 एप्रिल रोजी सावत्र भावानेच भावाचा खून केल्याची घटना घडली असुन अहमदपूर पोलीसात दोन आरोपी विरूध्द खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याविषयी सविस्तर माहीती अशी की अहमदपूर तालुक्यातील तळेगाव येथे सोमवारी दि 25 एप्रिल रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास घरगुती नळाला पाणी आले होते. पाणी भरताना आरोपी गणेश बाबुराव ससाने (19 वर्ष) व त्याच्या सावत्र भावाची पत्नी जयश्री ससाणे ( 27 वर्ष ) या दोघांमध्ये वाद झाला . जयश्रीचे पती व्यवसायाने खाजगी चालक असलेले नितीन बाबुराव ससाने (35 वर्ष) तासाभराने कामावरून घरी आले असता पत्नीने नळावर पाणी भरताना घडलेला प्रकार सांगीतला. रागाच्या भरात नितीन ससाने बाहेर जाऊन येतो असे सांगितले, व घराबाहेर पडले परंतु संध्याकाळी नऊच्या दरम्यान मानेवर खोलवर जखम झालेल्या अवस्थेत घरी आले व त्यांनी सांगितले की, गणेश याने सुरीने माझ्या गळ्यावर वार केला आहे.
जखमी अवस्थेतील नितीन ससाणे यास त्यांच्या पत्नीने गावकऱ्यांच्या मदतीने अहमदपुर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता येथील डॉक्टरांनी मयत झाले असल्याचे सांगितले. मयताची पत्नी जयश्री ससाणे यांच्या फिर्यादीवरून सावत्र दिर गणेश ससाणे , सासरे बाबुराव ससाणे (60 वर्ष) या दोघांविरुद्ध अहमदपूर पोलिसात गुरन 195/2022 कलम 302,34 भादवी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून , आरोपी गणेश ससाने फरार असून बाबुराव ससाणे यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक चितंबर कामठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल दुरपडे करीत आहेत.
प्राथमिक तपास पोलीस उप- निरिक्षक प्रभाकर अंधोरीकर यांनी केला तर सहा-पोलीस निरिक्षक रामचंद्र केदार, पोकॉ पद्माकर पांचाळ, पोहेकॉ सुहास बेंबडे, पोकॉ परमेश्वर वागतकर, चालक पोकॉ नारायण बेंबडे, खयुम शेख, पोना ठाकरे आदींनी सहकार्य केले
जयश्री ससाणे व नितीन ससाणे एका घरात तर आरोपी गणेश ससाणे व बाबुराव ससाणे दुस-या घरात राहत होते. या दोन्ही घरात नेहमीच या ना त्या कारणांवरून वाद होत होता . मागील काळात यांचे भांडणं गावातील तंटामुक्तीकडे गेली होती. मागील काळातील भांडणाचा राग व सोमवार दि 25 मार्च रोजी नळावर पाणी भरण्यासाठी झालेली तक्रार यामुळे राग अनावर झाला विकोपातून एका जीवास मुकावे लागले. अशी माहीती सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल दुरपडे यांनी दिली