आरोग्य तपासणी शिबिर घेऊन केला प्रा.विश्वंभर स्वामी यांनी वाढदिवस साजरा
माजीमंत्री बाळासाहेब जाधव यांनी न.प.सफाई कामगारांसाठी दिला 50 हजारांचा धनादेश.
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अहमदपूर तालुका अध्यक्ष प्रा. विश्वंभर स्वामी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, नगर परिषद अहमदपूर व पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नगर परिषद कर्मचारी व सफाई कामगार संघ यांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव , प्रमुख पाहुणे माजी राज्यमंत्री विनायकरावजी पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर परिषदेचे अधीक्षक सतीश बिल्लापट्टे होते. या कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवानंद हेंगणे, पाटील हॉस्पिटल चे संचालक डाॅ. ऋषिकेश पाटील, अहमदपूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र केदार, नगरपालिकेचे गटनेते राहुल शिवपुजे, नगरसेवक अभय मिरकले,अमीत रेड्डी, राजाभाऊ खंदाडे, वसंत शेटकार, भारतीय स्टेट बँकेच्या व्यवस्थापक सौ. विजया स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन नगर परिषदेचे कर्मचारी संभाजी भालेराव यांची प्रातिनिधिक स्वरूपात तपासणी करून करण्यात आले. या मोफत शिबिरामध्ये नगरपरिषदेचे कर्मचारी व सफाई कामगार संघाचे सर्व कर्मचारी, महिला यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन सर्व प्रकारच्या तपासण्या करून घेतल्या. मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. कार्यक्रमाचे उद्घाटक माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी या आरोग्य तपासणी शिबिरात औषध उपचारासाठी मदत म्हणून पन्नास हजार रुपयाचा धनादेश सढळ हाताने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व पाटील हॉस्पिटल यांना दिला. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघामध्ये नव्यानेच समाविष्ट झालेले बसवराज पाटील, बाबासाहेब वाघमारे व संदीप गुंडरे यांचा उद्घाटक बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते सत्कार करून पत्रकार संघात प्रवेश करुन घेतला. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. विश्वांभर स्वामी यांच्या सह पत्रकार रामलिंग तत्तापुरे व गोविंद काळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अहमदपूर तालुका अध्यक्ष प्रा. विश्वंभर स्वामी यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी पत्रकार संघाच्या वतीने मागील काही वर्षांमध्ये राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमा विषयीचा आढावा प्रास्ताविकामध्ये दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संघाचे सदस्य मारुती बुद्रुक पाटील यांनी केले तर आभार प्रा.डाॅ. बालाजी कारामुंगीकर यांनी मानले.
या शिबिरासाठी वैद्यकीय प्रतिनिधी ओमकार बिराजदार, शिवशंकर पाटील,कासीम पटेल,संगम सांगवे, विनोद शेळके,यज्ञेश्वर शिंदे,विनय उपलंचवार,दिपक हासुळे,अजीत करडखेले, गंगाधर तडकलकर, मल्लिकार्जुन स्वामी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सचिव गजानन भुसारे, उपाध्यक्ष शिवाजीराव गायकवाड, सदस्य बालाजी पारेकर, महादेव महाजन ,बालाजी तोरण,उदय गुंडीले, जगन्नाथ पुणे,चंद्रशेखर भालेराव, चंद्रकांत शिंदे , अजय भालेराव,धम्मानंद कांबळे, आदींनी परिश्रम घेतले.