उपद्रवी माकडाला सर्पमित्र शाम पिंपरे यांच्याकडून पाबंद
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर शहराचे उपनगर असलेल्या मलकापूर हद्दीत आणि सोमनाथपूर हद्दीत गेल्या अनेक दिवसापासून काही माकडांनी उपद्व्याप माजवला होता. तीन माकडांनी तर शालेय विद्यार्थ्यांना देखील त्रास देऊन जवळपास 15 ते 16 विद्यार्थ्यांना चावा घेऊन, बोचकरून जखमी केले होते. त्या माकडांना पाबंद करावा अशी मागणी जनतेची होती.
मलकापूर हद्दीतील नीलकंठेश्वर मंदिरामध्ये उत्सव चालू असताना येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांना, भाविकांना देखिलिया माकडांनी त्रास द्यायला सुरुवात केली होती. लहान मुलांच्या, महिलांच्या हातातील साहित्य घेऊन पळून जाणे, विरोध केल्यास चावा घेणे. बोचकारणे. असे प्रकार या माकडाने करायला सुरुवात केली होती. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
तीन माकडे आणि काही पिल्ले अशी त्यांची टोळी असल्यामुळे कोणीही त्यांना प्रतिबंध घालू शकत नव्हते. अशा अवस्थेत नागरिकांची गरज लक्षात घेऊन उदगीर सर्पमित्र संघटनेचे अध्यक्ष श्याम भाऊ पिंपरे आणि त्यांच्यासोबत योगेश तेलंगे, नरेश मुळे, सचिन सुळे यांच्या मदतीने सापळा रचून त्या माकडांना पाबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या माकडा पैकी एक माकड नांदेड बिदर रोड वरील आनंद नगर भागात चंद्रकांत काशिनाथ समगे यांच्या घरी उच्छाद माजवत असल्याचे समजताच, या सर्पमित्र टीमने तात्काळ त्या ठिकाणी जाऊन त्या माकडाला पकडले. त्याला पकडत असताना त्याने सर्पमित्र अध्यक्ष श्याम भाऊ पिंपरे यांनाही चावा घेतला. मात्र त्याची तमा न बाळगता या सर्व मित्रांनी त्याला पकडले आहे.
लवकरच त्याला वन विभागातील अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याची माहिती सर्पमित्र शाम भाऊ पिंपरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
