महात्मा फुले महाविद्यालयात डॉ.पवार यांच्या बी. आधार ग्रंथाचे प्रकाशन
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाचे प्रमुख सतीश ससाणे व किनगाव येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाचे प्रमुख बळीराम पवार यांनी संयुक्तरीत्या संपादित केलेल्या बी. आधार या आंतरराष्ट्रीय शोध निबंध ग्रंथाचे प्रकाशन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील व प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य डॉ. धोंडीराम वाडकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी भूषविले. तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील लोकसाहित्याचे ख्यातनाम अभ्यासक, संशोधक माजी प्राचार्य डॉ. धोंडीराम वाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. धोंडीराम वाडकर म्हणाले की प्राध्यापकांनी उत्तमरीत्या संशोधन केले पाहिजे संशोधन हा समाजाचा अविभाज्य घटक बनला पाहिजे. भारतीय स्त्रियांच्या समस्यांवर विविध अभ्यासकांनी लिहिलेल्या या ग्रंथातील लेखांचे महत्त्व अनन्यसाधारण असून, अशा प्रकारच्या संशोधनातून नव्यानव्या बाबींना उजळा मिळाला पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, साहित्य, समाज आणि संस्कृतीचे संशोधन ही काळाची गरज असून, नव्या दमाच्या लेखक, संशोधकांनी यासाठी पुढे आले पाहिजे आणि त्यांचे लेखन छापण्यासाठी अशा प्रकारच्या शोध निबंध ग्रंथांचे प्रकाशनही नियमितपणे झाले पाहिजे, असेही ते म्हणाले. बी. आधार या आंतरराष्ट्रीय शोध निबंध ग्रंथाचे संपादक डॉ. सतीश ससाणे व डॉ. बळीराम पवार या संपादक द्वयांचे त्यांनी या प्रसंगी जाहीर कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. मारोती कसाब यांनी केले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.