स्वातंत्र्यवीर सावरकरांनी समाजाला सप्तशृंखलेतून मुक्त केले – डॉ.संदीपान जगदाळे

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी समाजाला सप्तशृंखलेतून मुक्त केले - डॉ.संदीपान जगदाळे

दयानंद कला महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांची जयंती उत्साहात साजरी

लातूर (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान दिले. याबरोबरच जातिव्यवस्था मोडण्यासाठी समाजाला सप्तशृंखलेतून मुक्त करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. त्यात वेदोक्तबंदी म्हणजे स्वतःच्या क्षत्रियादिक धर्मबंधूंनासुद्धा वेद पठणाचा अधिकार नाही असे म्हणणारी तथाकथित उच्चवर्णीयांची मनमानी यापुढे चालणार नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले. तसेच व्यवसायबंदी, स्पर्शबंदी, सिंधूबंदी, शुद्धीबंदी, रोटीबंदी व बेटीबंदी या सप्तशृंखलेतून समाजाला मुक्त केले.” असे प्रतिपादन राज्य मंडळ सदस्य डॉ. संदिपान जगदाळे यांनी केले. ते दयानंद कला महाविद्यालयात आयोजित स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती कार्यक्रमात बोलत होते. प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पुढे डॉ.जगदाळे म्हणाले की,” अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्नागिरीत स्थानबद्ध केले. त्यांनी रत्नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या. जवळपास ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अनेक सहभोजने आयोजित केली. त्यांनंतर सर्वांसाठी ‘पतित पावन मंदिर’ सुरू केले.

अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड म्हणाले की, “स्वातंत्र्यवीर सावरकर यांना इंग्रजांनी दोनवेळा जन्मठेपेची शिक्षा दिली. त्यांचा अनन्वित छळ केला.अशाही स्थितीत त्यांनी विपुल लेखन केले. त्यांनी समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन दिला.ते स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. त्यांच्या साहित्याचे वाचन विद्यार्थ्यांनी करावे.

कार्यक्रमासाठी डॉ. प्रदीप सूर्यवंशी, डॉ. सुनीता सांगोले, डॉ. सुनील साळुंखे, डॉ.नितीन डोके, प्रा. शैलेश सूर्यवंशी, डॉ. प्रणिता फड, नंदकुमार खंडेलवाल, वशिष्ट कुलकर्णी, श्रीकांत जोशी आदी प्राध्यापक,कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने होते.

About The Author

error: Content is protected !!