आतेभावानेच मामेबहिणीवर केले अत्याचार
गरोदर पीडिता झाली फितूर: आरोपीला वीस वर्षाची सक्तमजुरीची
पुणे (रफिक शेख) : चुलतीकडे सोडण्यासाठी जात असताना अल्पवयीन मामेबहिणीवर आतेभावानेच अत्याचार केले. यात पीडिता गरोदर राहिली. या प्रकरणात पीडिता फितूर झाली. परंतु डीएनए अहवाल सकारात्मक आल्याने वैद्यकीय पुराव्याआधारे मामेबहिणीवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले अन् २२ वर्षीय आतेभावास न्यायालयाने वीस वर्षे सक्तमजुरी व वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी हा आदेश दिला. दंडाची रक्कम पीडितेस देण्यात यावी. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त १ वर्ष कारावास भोगावा लागेल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. २०१५ साली वानवडी परिसरात हा प्रकार घडला. आरोपीने चुलतीकडे सोडण्यास जाताना हांडेवाडी रोड येथील सेनिंग पार्कच्या कच्च्या रस्त्याने फिर्यादीस नेऊन जबरदस्तीने अत्याचार केले. त्यानंतर पीडितेला चुलतीच्या घरी सोडले.
अत्याचाराच्या चार महिन्यांनंतरही मासिक पाळी न आल्याने पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये, ती चार महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले. याप्रकरणी आरोपीविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करत त्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणात विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी काम पाहिले. त्यांनी सात साक्षीदार तपासले. यामध्ये डॉक्टर, सहायक रासायनिक विश्लेषक रोहन शिंदे, राणी काळे, पोलीस उपनिरीक्षक यांची साक्ष महत्त्वाची ठरली. पैरवी अधिकारी बी. एस. लोखंडे व हवालदार ए. एस. गायकवाड यांनी सहकार्य केले.