पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टिक कॅरी बॅगचा वापर बंद करा – मुख्याधिकारी शुभम क्यातमवार
प्लास्टिक बंदी अंतर्गत न. प.ची धडक कारवाई

उदगीर (एल.पी. उगीले) : उदगीर शहरामध्ये नगरपरिषदेच्या वतीने सिंगल युज (एकल वापर )प्लास्टिक जप्तीची कारवाई चालू करण्यात आली आहे. सर्व जनतेला वेळोवेळी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिक आणि थर्माकोल सारख्या वस्तूंचा वापर न करण्याच्या अनुषंगाने प्रबोधन करण्यात आले आहे. असे असताना देखील पुन्हा व्यापारी आणि जनता प्लास्टिकचा वापर करणे सुरु करत आहेत. हे चुकीचे असून अशी कृती करणाऱ्यावर नगरपालिकेच्या वतीने विशेष लक्ष ठेवण्यात आले असून दोषी आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. असा इशारा उदगीर नगरपालिकेचे मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांनी दिला आहे.
नगरपालिकेच्या विविध पथकाच्या वतीने दिनांक 10 जून रोजी संपूर्ण शहरांमध्ये विविध भागात एकूण 55 दुकानावर धाड टाकून प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. या कार्यवाही मध्ये एकूण 890 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग 2018 अन्वये महाराष्ट्र शासनाद्वारे प्लास्टिक व थर्माकोल इत्यादी पासून तयार वस्तू यांचे उत्पादन, विक्री, वाहतूक , वापर यांचे नियमन करण्याकरिता अधिसूचना 13 जून 2018 रोजी काढण्यात आली होती. संपूर्ण राज्यात एकल वापर प्लास्टिक वर व थर्माकोल पासून बनवलेल्या पत्रवाळी, द्रोण, वाट्या अशा वस्तूवर संपूर्ण राज्यात बंदी घालण्यात आली आहे.
असे असताना सदरील अधिसूचनेचे उल्लंघन झाल्यास पहिल्या वेळेस पाच हजार रुपये दंड, दुसऱ्या वेळेस 10 हजार रुपये दंड व तिसऱ्या वेळेस पंचवीस हजार रुपये दंड किंवा कारावास किंवा दोन्ही, असे दंड आकारण्यात येईल. तरी या अधिनियमाचे ऊलंघन कोणीही करू नये. असे आवाहन नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे.
सदरील प्लास्टिक बंदी अंतर्गत ची धडक कारवाई उदगीर नगर परिषदेचे मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियंता ज्ञानेश्वर काळे , स्वच्छता निरीक्षक अमित सुतार ,उमाकांत गंडारे, विनोद रंगवाळ, शेख सिकंदर, स्वच्छता विभागातील कर्मचारी तसेच मनोज बलांडे व अतिक्रमण विभागातील कर्मचारी यांच्या पथकाने कारवाई केली आहे. नगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या सदरील कारवाईचे उदगीर शहरामध्ये सर्वत्र कौतुक करण्यात येत असून अशी धडाडीची मोहीम कायम राबवली जावी. अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
उदगिर शहरात प्लास्टिक मुक्ती साठी अनेक स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन कापडाच्या पिशव्या वाटप करण्याची मोहीम हाती घेतली होती. मात्र काही दिवसानंतर कापडाची पिशवी घेऊन फिरणे नागरिकांनी बंद केले, व प्लास्टिकचा वापर सुरू केला . त्यामुळे अशा पद्धतीच्या मोहीमा वेळोवेळी राबवल्या जाव्यात, जेणेकरून नागरिकांना शिस्त लागेल. अशीही अपेक्षा व्यक्त केली.
