‘गुणवंतांना मोफत शिक्षण’ दयानंद शिक्षण संस्थेचा स्तुत्य उपक्रम – राहूल नागरगोजे
लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर मौजे दवणगाव येथे घेण्यात आले होते. शिबीराच्या समारोप प्रसंगी दयानंद शिक्षण संस्थेचे संयुक्त सचिव सुरेश जैन यांनी शब्द दिला होता, गुणवंत विद्यार्थ्यांना दयानंद शिक्षण संस्था मदतीचा हात देईल. आज श्रीकांत शेप या गुणवंत विद्यार्थ्यास प्रवेश देताना याचा प्रत्यय आला. असे उद्गार कामखेडा जिल्हापरिषद काँग्रेस, सर्कल प्रमुख राहूल नागरगोजे यांनी काढले. याप्रसंगी श्री.राहूल नागरगोजे यांनी आपले हदय मनोगत व्यक्त केले ते म्हणाले -“ दयानंद म्हणजे सर्व गुणवंतांना ऊर्जा देऊन पुढे नेणारे महाविद्यालय आहे याचा प्रत्यय शिबीराच्या वेळी आला आणि आजही आला. प्रस्तुत विद्यार्थी श्रीकांत शिवप्रसाद शेप (९८.४० % गुण ) या विद्यार्थ्यास दयानंद विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्राचार्य डॅा. शिवाजी गायकवाड सर व प्रा. डॅा. सुनीता सांगोले मॅडम यांनी सर्वतोपरी मदत केली.
गुणवंतांना मोफत शिक्षण या उपक्रमांतर्गत श्रीकांतची संपूर्ण फी माफ करण्यात आली. त्याबद्दल आम्ही संस्थेचे, महाविद्यालयाचे ऋणी आहोत. सांगण्यास आनंद वाटतो की, श्रीकांत च्या कुटुंबातीलच महेश शेप व मंगेश शेप यांनी दयानंद विज्ञान महाविद्यालयातूनच शिक्षण घेऊन आज एम.बी.बी.एस. करत आहेत. याच कुटूंबातील विश्वजीत गणेश शेप (८७%) हा सध्या इंटीग्रेटेड साठी प्रवेशित आहे.” प्राचार्य डॅा. शिवाजी गायकवाड यांनी पालकांनी संस्थेवर आणि महाविद्यालयावर टाकलेला विश्वास आपण निश्चितच खरा करु असे अश्वासन दिले. दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष ललितभाई शहा, सचिव रमेश बियाणी, सहसचिव सुरेश जैन यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.
