आपत्ती व्यवस्थापनात कोणतीहि हायगय खपवून घेणार नाही : आ.बनसोडे
उदगीर (एल.पी.उगिले) : सद्यस्थितीत अतिवृष्टीमुळे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे. असे आदेश माजी राज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी चोंडी येथील साठवण तलावाच्या पाहणी दरम्यान दिले. याप्रसंगी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता चिस्ती, कार्यकारी अभियंता काळे, उप अभियंता वाघमारे, कनिष्ठ अभियंता मोंढेस्वामी, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे कार्यकारी अभियंता दराडे, उदगीर तहसीलचे तहसीलदार रामेश्वर गोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
विधानसभा मतदारसंघातील चोंडी साठवण तलाव गेल्या काही दिवसापासून सतत पाउस चालू असलेल्या पावसामुळे पूर्णपणे भरला असून तलावाच्या पाळू मधून गळती सुरू झाली आहे.काही ठिकाणी पालूला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे पाण्याचा विसर्ग गतीने चालू आहे. पाणी गावात शिरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांना आश्वस्त करण्यासाठी तथा प्रशासकीय यंत्रणा गतिमान करण्यासाठी उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने तात्काळ भेट देऊन अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
नागरिकांचे आरोग्य हे लाख मोलाचे असून त्यासाठी तात्काळ दक्षता घ्या. अशा सूचनाही दिल्या आहेत. या दौऱ्याच्या दरम्यान त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव मुळे, ज्ञानेश्वर पाटील, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील, बाळासाहेब पाटील, सरपंच संजय कुमार चित्ते सावकार, प्रा. शाम डावळे यांच्यासह परिसरातील गावातून सरपंच आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आ. संजय बनसोडे यांनी नागरिकांशी सुसंवाद साधून प्रशासन आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. केवळ या साठवण तलावापुरते मर्यादितच नाही तर उदगीर विधानसभा मतदारसंघात कोणत्याही स्वरूपाची आपत्ती निर्माण होणार नाही, या दृष्टीने प्रशासनाने सज्ज राहावे. अशाही सूचना याप्रसंगी आमदार संजय बनसोडे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.