सामाजिक जाणीव जपण्यासाठी महिलांनी राजकारणात यावे : सुस्मिता माने
उदगीर (प्रतिनिधी) : एक पुरुष शिकला तर तो एकटाच शिकतो, मात्र एक स्त्री जर सुशिक्षित झाली तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होत असते. याचे भान आणि जाण ठेवून महिलांनी शिक्षणासोबतच समाजकार्यातही अग्रेसर व्हावे. जेणेकरून सामाजिक जाणीव प्रगल्भ होतील, आणि समाजाचे खऱ्या अर्थाने भले होईल. असा विचार राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या जिल्हाध्यक्ष सुस्मिता माने यांनी व्यक्त केले.
त्या राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या वतीने आयोजित महिलांच्या बैठकीत प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. या बैठकीच्या नंतर सामाजिक कार्यासाठी सक्रिय असलेल्या आणि समाजकार्यासाठी वेळ देणाऱ्या तरुणींची निवड राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या कार्यकारणीत करण्यात आली. याप्रसंगी फुलेनगर, सिद्धार्थ सोसायटी, गांधीनगर, बागबंदी, तळवेस, दत्तनगर, मुसा नगर, अंबिका कॉलनी इत्यादी भागातील महिलांनी या बैठकीत सहभाग नोंदवला होता.
या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. ज्यामध्ये प्रामुख्याने कमल प्रकाश सकट यांची शहर उपाध्यक्षपदी तर अनिता राजू मादळे तालुका उपाध्यक्षपदी, मायादेवी शिवाजी कांबळे शहराध्यक्ष, कांचन काटेकर यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. सुषमा संतोष मुंडे यांची तालुका अध्यक्षपदी तसेच बालिका सुकटे शहर सरचिटणीस पदी तर अंजली देडे यांची शहर सचिव पदी निवड करण्यात आली.
विश्वभुषण, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेमध्येच स्त्री आणि पुरुष यांना समान अधिकार दिलेले आहेत. त्याचा फायदा घेत आपण देखील समाजासाठी पुढे आले पाहिजे. याची जाणीव महिलांनी ठेवणे गरजेचे आहे. असेही याप्रसंगी सुश्मिता माने यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी महिलांच्या वेगवेगळ्या प्रश्नावरही चर्चा करण्यात आली. तसेच आपल्या प्रभागातून कर्तबगार आणि आपल्या प्रभागाचा विकास करू शकेल अशाच व्यक्तीला नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये निवडून द्यायचे ठरले. राष्ट्रीय दलित अधिकार मंचाच्या प्रदेश कार्यालयात सदरील बैठक संपन्न झाली.राष्ट्रीय दलित आधिकर मंचचे प्रदेश अध्यक्ष निवृतिराव संगवे सोनकांबले यांचे मार्गदर्शन खाली काम करायचे ठरले.