उपेक्षितांच्या शब्दांना धार देणारे साहित्यिक अण्णाभाऊ साठे – डॉ शरद कुमार तेलगाने
उदगीर (प्रतिनिधी) : तत्कालीन समाजातील उपेक्षित, शोषित, मजूर यांचा आवाज दाबणारी जी समाज यंत्रणा होती, त्या समाज यंत्रणेच्या विरोधात बंड करून आपल्या लेखणीच्या माध्यमातून जन चळवळ उभा करणारे महानायक म्हणजे अण्णाभाऊ साठे होत. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने उपेक्षितांचा आवाज बुलंद केला. तसेच सामान्य माणसांना पेटून उठायला प्रेरणा दिली. अण्णाभाऊच्या साहित्यातील प्रत्येक नायक हा पिढीत, शोषित समाजाचा घटक आहे.
त्यामुळे शोषित समाजात क्रांती घडवून आणण्याचे काम अण्णाभाऊंच्या साहित्याने केले. असे उद्गार सामाजिक कार्यकर्ते तथा प्रबोधनकार,कीर्तनकार, तज्ञ डॉक्टर शरदकुमार तेलगाने यांनी व्यक्त केले. ते उदगीर येथील समता नगर भागात आयोजित करण्यात आलेल्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाचे ध्वजारोहण त्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेविका सौ. बबीता भोसले या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक नरसिंग शिंदे, माजी नगरसेवक गणेश गायकवाड, उद्धव गायकवाड, पत्रकार कसबे, कृष्णा मोटे ,बळीराम गायकवाड, दयानंद गायकवाड ,समता नगर भागातील जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष शिवाजी सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ शरद कुमार तेलगाने म्हणाले की, आजचा दिवस हा क्रांती घडवून आणलेला दिवस आहे. अण्णाभाऊंच्या रूपाने या देशाला मिळालेली एक अनमोल देणगी आहे. अण्णाभाऊंच्या साहित्य रचनेमुळे जगभर त्यांची कीर्ती पसरली. समाजवादी विचारधारा स्वीकारून सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका त्यांनी सतत घेतली. शोषित, उपेक्षित मजूर यांचा जो छळ होत होता त्याच्या विरोधात अण्णाभाऊ साठे यांनी आवाज उठवला.
जगभरातून त्यांची वाहवा होऊ लागल्यानंतर भारतातील जनतेला त्यांचे मोठेपण कळाले. असेही डॉक्टर शरदकुमार तेलगाने यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती समता नगर चे अध्यक्ष शिवाजी सूर्यवंशी यांनी केले, तर आभार नरसिंग शिंदे यांनी केले.प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
