हर घर तिरंगा उत्सवात सहभागी होण्यास शेतकरी निरुत्साही – अनिल घनवट

हर घर तिरंगा उत्सवात सहभागी होण्यास शेतकरी निरुत्साही - अनिल घनवट

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाने ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्याचे आवाहन केले आहे. स्वातंत्र्य प्राप्तीला ७५ वर्ष झाली तरी शेतकरी मात्र पारतंत्र्यातच असल्याचा अनुभव असल्यामुळे शेतकरी या उत्सवात सहभागी होणार नाहीत. आपल्या भावना शेतकऱ्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना कळवाव्यात असे आवाहन स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी केले आहे.

भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. महाराष्ट्र शासनाने, ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट दरम्यान सर्व नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहन केले आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात भारतातील शेतकऱ्यांचे फक्त शोषणच झाले व शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. शेतीमालाचे भाव जाणीवपूर्वक पाडण्याचे कारस्थान सतत सुरू आहे. त्यासाठी निर्यातबंदी, साठ्यांवर मर्यादा, अनावश्यक आयाती यासारखी हत्यारे वापरली जात आहेत. शेतकऱ्यांचे भुमी हक्क संकुचित केले आहेत, अन्यायाविरुद्ध न्यायालयात दाद मागण्यास सुद्धा बंदी आहे, हे कसले स्वातंत्र्य?

इंडिया सरकारकडून भारतातील शेतकऱ्यांच्या होणाऱ्या शोषनाचे परिणाम म्हणजे आजपर्यंत झालेल्या लाखो शेतकरी आत्महत्या आहेत. देशात गरिबी , बेरोजगारी आहे. देश आर्थिक संकटात लोटला जात आहे. अशा परिस्थितीत न मिळालेल्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यात भारतातील शेतकऱ्यांना रस नाही असे निवेदनात म्हटले आहे.

अनेकांच्या बलिदाना नंतर मिळालेल्या भारताच्या स्वातंत्र्या बद्दल शेतकऱ्यांना अभिमान आहेच त्यामुळे सालाबादा प्रमाणे १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन शेतकरी साजरा करतीलच, पण ७५ वर्ष होऊनही कृषिप्रधान भारतातील शेतकऱ्यांपर्यंत खरे स्वातंत्र्य पोहोचलेच नाही याची मात्र खंत आहे. आजही शेतकऱ्यांना व्यवसायाचे स्वातंत्र्य नाही, तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य नाही, जमीन किंवा व्यवसायाच्या विस्ताराचे स्वातंत्र्य नाही. स्वातंत्र्यप्राप्ती नंतरही ‘शेतकऱ्यांचे मरण हे सरकारचे धोरण’ राहिले आहे,हे सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी व सरकारच्या अशा धोरणाबाबत नाराजी व्यक्त करण्यासाठी हे निवेदन मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पाठवायचे आहे.

महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हे पत्र महाराष्ट्र शासनाला पाठवले तर शेतकऱ्यांच्या समस्यांवर काही उपाय योजना होण्याची अपेक्षा करता येईल.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या भावना महाराष्ट्र शासनाला कळवाव्यात असे आवाहन लातूर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके, कार्याध्यक्ष बालाजी जाधव, जिल्हा उपाध्यक्ष कालीदास भंडे,उपाध्यक्ष वसंत कंदमुळे, शिरुर अनंतपाळ तालुकाध्यक्ष किशनराव शिंदे,उदगीर तालुकाध्यक्ष जनार्दन पाटील, अहमदपूर तालुकाध्यक्ष हनुमंत आरदवाड,औसा तालुका संपर्क प्रमुख कल्याणाप्पा हुरदळे, निलंगा उपाध्यक्ष करण भोसले, केशव धनाडे,युवा नेते विवेक पाटील,मल्लीनाथ कात्रे, शिवाजी हजारे, नागनाथ राघु, दत्ता मुगळे, विठ्ठल संपते,राम मसलगे, बाळासाहेब जाधव,यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

About The Author