अतिवृष्टी व गोगलगायींच्या प्रादुर्भावाने पिकांच मोठ नुकसान; शेतकर्यांना तात्काळ मदत करा
आ. संभाजी पाटील निलंगेकर यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्हयात उशीराने पाऊस पडला होता. यामुळे पेरणीलाही उशीर झाला. यानंतर पावसाने मोठया प्रमाणात हजेरी लावली होती. जिल्हयातील बहुतांश भागात तर अतिवृष्टी झालेली आहे. यामुळे पेरणी झालेली पिके वाहुन गेली आहेत. तसेच सतत पडणा-या पावसामुळे खरीप पिकाचे ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेले आहे. त्यानंतर गोगलगाय, पैसा या सारख्या किडीचा आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात झालेला आहे. यामुळे पेरणी झालेल्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. सदर नुकसान ८० टक्केपेक्षा अधिक असल्याचे कृषि विभागाच्या वतीने सांगण्यात आलेले आहे. काही भागात तर अतिवृष्टी झाल्यामुळे पिके वाहुन गेलेली असुन काही शेतांमध्ये अजुनही मोठया प्रमाणात पाणी साचलेले पाहण्यास मिळत आहे. सदर परिस्थिती उद्भवल्याने खरीपाचा हंगाम हातातून जाण्याची दाट शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर महसूल व कृषि विभागाने पंचनामे केलेले आहेत. या पंचनाम्याच्या माध्यमातून शेतक-यांच्या पदरात आता खरीपाचे पिक पडणार नाही, असे सांगण्यात आलेले आहे. त्यामुळेच राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी ( NDRF) व राज्य आपत्ती निवारण निधी (SDRF) च्या अंतर्गत शेतक-यांना तात्काळ मदत मिळणे आवश्यक आहे. NDRF च्या माध्यमातून केंद्र सरकारने तर SDRF च्या अंतर्गत राज्य सरकारने शेतक-यांना मदत करणे गरजेचे आहे. सदर मदत दोन टप्यात देण्यात यावी, जेणेकरून शेतकरी पुन्हा एकदा रब्बी हंगामाची पेरणी करण्यासाठी आर्थिकदृष्टया सक्षम ठरेल.