स्वातंत्रसेनानी मुर्गाप्पा खुमसे यांचा दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीने सन्मान

स्वातंत्रसेनानी मुर्गाप्पा खुमसे यांचा दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीने सन्मान

लातूर (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लातूर जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्रसेनानी मुर्गाप्पा काशिनाथ खुमसे यांचा त्यांच्या रेणापूर येथील राहत्या घरी जाऊन दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीने शॉल, बुके व अशोक स्तंभाचे स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

स्वातंत्रसेनानी यांचा ‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्त सन्मान केल्यानंतर त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक झुंजार व समतेसाठी दिलेल्या लढ्यांना उजाळा दिला. त्यांनी 1935 मध्ये रेणापूर येथे आर्य समाजाची स्थापना केली व या चळवळीच्या माध्यमातून हैदराबाद संस्थानातील जुन्या बीड जिल्ह्यातील रेणापूर येथून त्यांच्या सामाजिक व राजकीय चळवळीला सुरूवात केली. या बरोबरच कलापथक, पोवाडा या माध्यमातूनही त्यांनी स्वातंत्र्यासाठी जनतेमध्ये जागृती निर्माण करण्याचे कार्य केले.

रेणापूर येथे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचा राष्ट्रध्वज फडकविल्यामुळे श्री. खुसमे यांना अटक करून अंबेजोगाई (जुणे मोमीनाबाद) येथील तुरुंगात बंदिस्त करण्यात आले. काही तुरुंगाचे लोखंडी गज तोडून त्यांनी सहकाऱ्यासह पलायन केले व सोलापूरला जाऊन सहकाऱ्यांच्या मदतीने हैदराबाद संस्थानच्या सरहदीवर सशस्त्र कँपमध्ये सहभागी झाले. तत्कालीन हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करावे म्हणून निजामाच्या विरोधात सशस्त्र लढा दिला. दि.17 सप्टेंबर 1948 हैदराबाद संस्थान स्वतंत्र होईपर्यंत त्यांनी लढा दिला.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही ते सर्वसामान्य शेतमजूर, शेतकऱ्यांसाठी संघर्ष करीत राहिले. विनोबा भावे यांची भूदान चळवळ जमीनदारांच्या संरक्षणासाठी आहे. असे जाहीर सांगून या चळवळीला त्यांनी कडाडून विरोध केला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती आंदोलन या चळवळींमध्ये ते सक्रीय होते. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी त्यांनी मुंबई राज्याच्या सचिवालयास घेराव घातला. त्यावेळी त्यांना अटक होऊन सेनापती बापट, आचार्य अत्रे, यांच्यासह त्यांना मुंबई येथील ऑर्थर रोड तुरुंगांत डांबण्यात आले. 1966 मध्ये भूमिहीन दलितांना सरकारी गायरान जमीन मिळवून देण्यासाठी दादासाहेब गायकवाड यांनी सूरु केलेल्या आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला.

खुमसे यांनी 103 व्या वर्षात पदार्पन केले असूनही त्यांच्या अंगी पूर्वीसारखाच उत्साह पाहून प्रतिनिधींना आर्श्चय वाटले. दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी, उपाध्यक्ष अरविंदराव सोनवणे, ललितभाई शाह, रमेशकुमार राठी, सचिव रमेशजी बियाणी, संयुक्त सचिव सुरेश जैन, कोषाध्यक्ष मा. संजयजी बोरा यांची यासाठी प्रेरणा लाभली तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायवाड यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाच्या वतीने मराठी विभाग प्रमुख डॉ. शिवाजी जवळगेकर, इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ. आर.एस.पारवे, डॉ. अंकुशकुमार चव्हाण, डॉ.अमोल शिंदे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मुर्गाप्पा खुमसे यांचा सन्मान केला.

About The Author