वृक्ष रक्षाबंधन: विद्यार्थ्यांनी झाडांना राख्या बांधून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश
‘वसुंधरा’ प्रतिष्ठानच्या आवाहनाला गावागावांत प्रतिसाद
औसा (प्रतिनिधी) : भारतीय संस्कृतीत महत्वाचा मानला जाणारा सण राखी पौर्णीमा सण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो . या दिवशी बहिणी प्रेमाचे प्रतिक म्हणुन भावांना राख्या बांधतात आणी बहिणीचे रक्षण करावे तसेच त्यांच्या प्रिय भावास दीर्घायुष्य लाभावे, यासाठी देवाकडे प्रार्थना करतात . नेमका हाच संदेश वापरून औसा तालुक्यातील तपसेचिंचोली, नागरसोगा, तसेच गाडवेवाडी येथे विद्यार्थ्यांनी तसेच लहान मुलींनी वृक्षांना राख्या बांधून वृक्ष आमचे बंधू असून त्यांना दिर्घायुषी लाभो व प्रदूषणाच्या दैत्यापासून आम्हा सर्वांचे रक्षण होवो अशी प्रार्थना केली. वसुंधरा प्रतिष्ठान लातूर यांच्या उपक्रमाला प्रतिसाद देत तपसेचिंचोली जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा आगळा वेगळा उपक्रम राबवुन वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला. सदर उपक्रम केवळ औपचारिकता म्हणुन न राबविता वेळोवेळी या वृक्षांच्या सुरक्षीततेची जबाबदारी स्वीकारून व वेळ पडल्यास त्यांच्या सुरक्षिततेसाठी संघर्ष करण्याचा मानस सुद्धा तपसेचिंचोली शाळेच्या चिमुकल्यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रसंगी तपसेचिंचोली जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी धनश्री सेलूकर, संस्कृती शिवरे, अक्षदा गायकवाड, अमृता यादव, शिवानी मुळे, विद्या जाधव, कपिल मुळे, लक्ष्मी कोरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
वसुंधरा प्रतिष्ठानच्या वृक्ष रक्षाबंधन उपक्रमाला गाडवेवाडी येथील आर्या गाडवे शौर्या गाडवे या चिमुकल्या मुलींनी प्रतिसाद देत घराच्या अंगणात असलेल्या झाडांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला. यावेळी दगडू गाडवे, भीमाशंकर गाडवे उपस्थित होते.
भारतीय संस्कृतीत रक्षाबंधन हा सण महत्वाचा मानला जातो. बहिणी प्रेमाचे प्रतीक म्हणून भावांना राख्या बांधतात आणि भावांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करतात. नेमका हाच संदेश वापरून व वसुंधरा प्रतिष्ठान लातूर यांच्या वृक्षरक्षाबंधन या उपक्रमाला प्रतिसाद देत नागरसोगा प्रशालेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी शालेय परिसरातील वृक्षांना राख्या बांधत वृक्ष आमचे भाऊ, त्यांना दीर्घायुष्य लाभो,प्रदूषणाच्या दैत्यापासून आमचे संरक्षण करावे अशी प्रार्थना केली. शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी काकासाहेब फडणीस, बबन सूर्यवंशी, प्रकाश जाधव, भुरे माधुरी, प्रतिभा बनसोडे, श्रीधर चौधरी, विकास मगर, इनामदार, मिलनकुमार कोव्हाळे, यादव मॅडम, उषा घोडके, निडोळे अरुण, सारगे गंगाधर, गवळे मॅडम, यशवंत सूर्यवंशी, बाळू बेडगे, गहिनीनाथ फावडे, यशवंत शिंदे , भास्कर सूर्यवंशी आदी जण उपस्थित होते.