आडोळ तांडा येथे रस्ता नसल्याने लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी करावी लागते कसरत
उदगीर (एल.पी.उगिले) : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून उदगीर तालुक्यातील आडोळ तांडा रस्त्यापासून आजही वंचित आहे अनेकवेळा आडोळ तांड्यातील नागरिकांनी उपजिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय समोर रस्त्याच्या मागणीसाठी उपोषण व आंदोलने केली. तरी प्रशासनाने आजपर्यंत या तांड्याच्या रस्त्याकडे लक्ष दिले नाही.
नागरिकांनी ग्रामपंचायत सोमनाथपुर येथे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनाही निवेदन दिले. तरीही तांड्याला रस्ता करून देण्यासाठी कोणीही 75 वर्षांच्या काळात पुढे आले नाही. अनेक लोकप्रतिनिधी होऊन गेले पण या तांड्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. तांड्यातील लहान मुले शिक्षणासाठी उदगीर शहरात येतात. मात्र तांड्याला रस्ताच नसल्याने लहान मुले दररोज स्वतःचा जीव धोक्यात घालून नदी पार करून शाळेत जतानाचे चित्र पाहायला मिळत आहे 75 वर्षा पासून आजपर्यंत आडोळ तांड्यातील नागरिकांनी रस्त्यासाठी लढा दिला, परंतु नागरिकांच्या या लढ्याला अपयश आले.
बेटी पढावो देश बचाओचा नारा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला, ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून प्रशासनाने शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुला मुलींच्या भविष्याचा विचार करून आडोळ तांड्याच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा शाळेत जाणाऱ्या या लहान मुलांच्या जीवाशी धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
एका बाजूला सतत पाऊस होत असताना आडोळ तांड्यातील लहान मुलांनी शाळेत जाण्यासाठी नदीतुन वाट काढीत जतानाचे चित्र पाहायला मिळाले. सध्या पाऊस सुरू असून नदी नाल्याना मोठया प्रमाणात पूर येत असल्याने लहान मुलांच्या जीवितांचा विचार करून रस्ता तयार करून द्यावा. अशी मागणी नागरिकांतून होत आहे.