उदगीरमधील निवासी आणि नवी मुंबईत सेवेत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या !
वाशी पोलीस ठाण्यातच सहाय्य्क पोलीस निरीक्षक भूषण पवार यांची गोळया झाडून आत्महत्या
नवी मुंबई : नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण पवार यांनी आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एपीएमसी पोलीस ठाण्यातच आपल्या सर्व्हिस पिस्तुलातुन स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे . भूषण पवार हे मूळचे लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील रहिवाशी होते त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी चाकूर येथील एका ॲकॅडमी तून प्रशिक्षण पूर्ण करून पोलिसी सेवेमध्ये पदार्पण केले होते.
पोलीस अधिकारी भूषण पवार हे एपीएमसी पोलिस स्टेशन मध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक या पदावर कार्यरत होते. सुमारे ४० वर्ष अवयोगटातील तरुण अधिकारी होते. मागील अनेक दिवसांपासून भूषण पवार हे रजेवर होते आणि आज ते कामावर रुजू झाले. एपीएमसी पोलीस ठाण्याच्या डिटेक्शन रूममध्ये ते बसत होते. यावेळी आपल्या केबिन मध्ये ते एकटेच बसले होते. त्यानंतर आतून गोळी झाडल्याचा आवाज आल्यानंतर इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या केबिनकडे धाव घेतली असता भूषण पवार यांनी स्वतःवर गोळी झाडल्याचे निदर्शनास आले. त्यांना तात्काळ वाशी एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झाले नसले तरी मागील काही दिवसांपासून ते तणावात वावरत असल्याचे त्यांच्या एकंदरीत वागण्यावरून दिसत असल्याचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी सांगितले.