लातूर पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक महेबूब गल्लेकाटू यांना ‘राष्ट्रपती पोलिस पदक’ जाहीर
लातूर (प्रतिनिधी) : पोलीस दलात कार्यरत असतांना नेमणुकीच्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना शासनाकडून सन्मानित केले जाते. पोलिस पदकांनी सन्मानित झालेल्या पोलिसांमध्ये लातूर पोलीस दलात कार्यरत श्रेणी पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश असून पोलिस दलात सर्वोत्कृष्ट सेवा देणाऱ्या पोलिसांना दरवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचे पोलिस पदक जाहीर केले जाते. यावर्षी सुद्धा पोलीस दलात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलिसांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. यात लातूर जिल्हा पोलीस दलातील आतंकवादी विरोधी कक्ष येथे नेमणुकीस असलेले श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महेबूब गल्लेकाटू यांचा समावेश आहे. लातूर पोलीस दलासाठी ही अभिमानास्पद कामगिरी आहे.
लातूर जिल्हा पोलीस दलातील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक गुलाम महेबूब गुलाम हैदर गल्लेकाटू हे दहशतवाद विरोधी पथक, लातूर कार्यरत असून ते 23/01/1986 भरती झाले होते. त्यांची आजपर्यंत 36 वर्ष 7 महिन्यांची उत्कृष्ट सेवा झाली असून त्यांचा मूळ गाव उदगीर आहे. त्यांनी आजपर्यंत पोलीस ठाणे गांधी चौक, शिरुर अनंतपाळ, लातूर ग्रामीण, उदगीर ग्रामीण, औसा, विशेष पथक लातूर, दहशतवाद विरोधी पथक (नांदेड विभाग), येथे सेवा बजावली आहे त्यांची पत्नी शिक्षिका असून दोन मुले उच्च विद्या विभूषित आहेत.
त्यांनी आपल्या नेमणुकीच्या ठिकाणी असतांना उल्लेखनिय व वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. या कामगिरीची दखल घेत त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक बहाल करण्यात आलेले आहे. लातूर पोलीस दलाच्या वतीने त्यांचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी कौतुक केले असून त्यांच्या पुढील सेवे करीता शुभेच्छा दिल्या आहेत.