लॉज फक्त नावाला !!
वापर अवैध कामाला !!!
उदगीर (एल.पी. उगिले) : उदगीर शहरातील काही प्रतिष्ठित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दारूच्या दुकानाजवळच्या किंवा परमिट रूम जवळच्या लॉज या बोर्डिंग साठी कमी आणि इतर अवैध कामासाठी जास्त वापरात येत असल्या संदर्भात तक्रारी वाढल्या होत्या. या गोष्टीची गांभीर्याने नोंद घेत, उदगीर शहरातील एका लॉज वरील बंद रूमला जुगाराचा अड्डा बनवून जुगार खेळत असताना पोलिसांनी धाड टाकून 25 हजार 900 रुपये जप्त केले. तसेच जुगाराचे साहित्यही जप्त करून तीन आरोपींच्या विरोधात रीतसर गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून हाती आलेली माहिती अशी की, उदगीर शहरातील शासकीय दूध योजनेच्या समोरील साई रेसिडेन्सी लॉज मधील रूम नंबर 117 मध्ये पत्त्याचा जुगार पैसे लावून खेळवीत व खेळत असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती हाती येताच, उदगीर पोलिसांनी लगेच धाड टाकून आरोपींना अटक केली आहे.
उदगीर शहर पोलीस स्टेशनचे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड यांना ही बातमी समजताच, यासंदर्भात त्यांनी उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल जॉन बेन यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून घर झडती वॉरंट घेतले. तसेच सोबत दोन पंच आणि हवालदार चिमोले, पो ना विष्णू गुंडरे, गजानन पल्लेवाड, पोलीस शिपाई बबन चव्हाण यांच्यासह साई रेसिडेन्सी मधील रूम नंबर 117 मध्ये छापा मारला असता आरोपी अन्वर बाबुमिया मणियार, असलम हुसेन साहब मणियार, इब्राहिम अब्दुल रजाक मणियार हे तिघे जुगार खेळताना आढळले.
या प्रकरणी पोलीस नाईक विष्णू गुंडरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या तिघा आरोपी विरुद्ध उदगीर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदगीर शहरातील परमिट रूम आणि बार नजीक किंवा लगत असलेल्या अनेक लॉजवर ड्राय डे च्या दिवशी खुलेआम जादा दराने दारू उपलब्ध होते, तसेच इतरही अवैध धंदे करण्याची मुभा दिली जात असल्याची चर्चा शहरात चालू आहे. शरीर विषयक गुन्ह्यांच्या अनुषंगाने अशा ठिकाणीच बीजारोपण होत असल्याचीही चर्चा आहे.
