लोणी गावचे सरपंच व उपसरपंच अपात्र! तालुक्यात एकच चर्चा !
उदगीर (एल पी उगिले) : उदगीर शहरालगत असलेल्या लोणी या गावातील सरपंच आणि उपसरपंच यांच्या संदर्भात ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 39/ 1 अनुसार दाखल केलेल्या अपिलाचा निकाल अप्पर विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी दिला असून सदरील निकालात लातूर जिल्हा परिषदेचे मुख्याकार्यकारीधिकारी यांनी दाखल केलेला प्रस्ताव अंशतः मान्य करण्यात येतो. तसेच सरपंच श्रीमती उषा यमुनाजी भुजबळे व उपसरपंच वैजनाथ रामराव बिरादार यांना अपात्र करण्यात येत आहे. तसेच सर्व संबंधितांना कळवून संचिका अभिलेखे कक्षात पाठवावेत. असे आदेशित केले आहे.
या निकालामुळे जिल्हाभर राजकीय गटात चर्चेला उधाण आले आहे. 2021 साली लोणी ग्रामपंचायतच्या निवडणुका संपन्न झाल्या होत्या. त्यानंतर सरपंच आणि उपसरपंच यांनी आपल्या पदाचा गैरउपयोग करून सार्वजनिक विहीर बुजून टाकली होती. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीने जनावरांना पाणी पिण्यासाठी बांधलेला हौदही पाडून टाकला होता. त्या ठिकाणी ग्रामस्थ कचरा टाकत असल्याने परिसरात दुर्गंधी आणि रोगराई पसरत होती.
तसेच या विहिरीच्या लोखंडी साहित्याची परस्पर विक्री करून, विक्री केलेली किंमत ग्रामनिधी मध्ये जमा केली नाही. किंवा ही विहीर पाडण्यासाठी, बंद करण्यासाठी कोणताही ठराव घेतला नाही. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी या संदर्भात आवाज उठवला होता. त्यानंतर खोटा ठराव लिहिला गेला अशी ग्रामस्थांची तक्रार आणि आरोप आहे. या सर्व गोष्टीचे गांभीर्य विचारात घेऊन पदाचा गैरवापर केल्याचा आरोप ग्राह्य धरला आहे. तसेच सरपंच या महिला असल्याने तिचे पतीच आपण सरपंच असल्याचे भासऊन सर्व व्यवहार पाहत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच यासंदर्भातील पुरावे ही ग्रामस्थांनी दाखल केले आहेत. या सर्व बाबींची दखल घेऊन सदरील निकाल देण्यात आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
