कोनाळे यांचा आदर्श सर्व पिढ्यांनी घ्यावा – डॉ. सुरेंद्र आलूरकर
उदगीर (प्रतिनिधी) : लाल बहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालय उदगीरच्या सेवागौरव समारंभ प्रसंगी अध्यक्षीय समारोपात डॉक्टर सुरेंद्र आलूरकर बोलत होते. उमाकांत कोनाळे हे नियत वयोमानाप्रमाणे सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त विद्यालयात सेवागौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले. दीपप्रज्वलन तसेच सरस्वतीमाता व लालबहादूर शास्त्रीजी यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या यथोचित सत्कारानंतर एन एम एम एस परीक्षेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शंकर वाघमारे व आशा मोरे यांनी त्यांच्या मनोगतात उमाकांत कोनाळे गुरुजींच्या जीवनावर प्रकाश टाकत,तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतील अनुभव कथन केले.प्रमुख अतिथी सुनील वसमतकर म्हणाले” कोनाळे गुरुजींचे कार्य पिढी घडवणारे असून,आयुष्यभर त्यांनी माणसं जोडण्याचे कार्य केले. त्यांचे कार्य नेहमी प्रेरणा देत राहील. ” सत्काराला उत्तर देताना कोनाळे गुरुजी म्हणाले” वेंकटेशराव देशपांडे व मोहनराव मोरे गुरुजींच्या सहवासात आम्ही घडलो.संस्थेमुळे खूप मोठे झालो. संस्थेच्या आम्ही ऋणात राहू.
” अध्यक्षीय समारोपात डॉ. आलूरकर म्हणाले, “कोनाळे गुरुजी म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व.त्यांच्या शांत व सुस्वभावाने त्यांनी सर्वांना आपलेसे केले.त्यांचे कार्य वृक्षाप्रमाणे सदैव काही ना काही देतच राहिले.” याप्रसंगी केंद्रीय कार्यकारणी सदस्य तथा स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह शंकरराव लासुने,अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार,माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी, मीनाक्षी कोनाळे, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे, उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड,पर्यवेक्षक बलभीम नळगिरकर, लालासाहेब गुळभिले, माधव मठवाले, प्रमोद कुलकर्णी, व्यंकटराव गुरमे, रमाकांत क्षीरसागर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन अनिता येलमटे,स्वागत व परिचय आरती तेलंग, प्रास्ताविक माधव मठवाले, वैयक्तिक गीत प्रीती शेंडे, आभार बालाजी पडलवार व शांती मंत्र केरबा नेमट यांनी म्हटले.