सकारात्मक माणुसच संधीचे सोने करतो : डॉ. हनुमंत भोपाळे
शिवाजी महाविद्यालयात आदर्श शिक्षकांचा सत्कार
उदगीर – नकारात्मकता हे जीवनातले विष असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नकारात्मक विचार, भावना व विचारांचे तन फेकून दयावे व सकारात्मकतेचे बीज पेरावे. जीवनात संकटेही असतात व संधीही असते परंतु नकारात्मक माणसाला ही संधी दिसत नाही. सकारात्मक मानवच त्या संधीचे सोने करुन यशस्वी होतो असे मत डॉ. हनुमंत भोपाळे यानी व्यक्त केले. ते शिवाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व आय. क्यू. ए. सी. विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आदर्श शिक्षकांचा सत्कार विशेष व्याख्यान व शिक्षक सन्मान सोहळ्यात बोलत होते. यावेळी शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी व्यासपीठावर किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष नामदेवराव चामले उपस्थित होते. याप्रसंगी उदगीर शहरातील माधव कदम, राम जाधव, मोहन खिंडीवाले, सुमित्रा वट्टमवार व यशवंतराव बिरादार इत्यादि शिक्षकांचा त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना डॉ. भोपाळे यांनी वेळेचे महत्व स्पष्ट केले. त्यासोबतच माणसाचा आयुष्यातील शिक्षणाचे महत्वही स्पष्ट केले. तर सत्कारास उत्तर देताना राम जाधव यांनी शिक्षण व चांगल्या माणसांच्या सानिध्यामुळे मी कसा घडलो हे सांगितले. याप्रसंगी इंजीनियर शिवाजीराजे पाटील यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक बाबींवर प्रकाश टाकला. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव यांनी चांगले आयुष्य जगण्यासाठी शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही असे मत मांडले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. बालाजी सूर्यवंशी यांनी या कार्यक्रमाचे संयोजन व संचलन केले तर डॉ. किरण गुट्टे यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. आर एम मांजरे ,डॉ डी बी मुळे, डॉ.व्ही डी गायकवाड, प्रा. ए एस टेकाळे, डॉ. एस डी सावंत ,डॉ व्ही के भालेराव, डॉ एच ए तिरपुडे, डॉ रंजन येडतकर व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
