शिक्षक दिनी वाचक मित्र शिक्षक पुरस्कार देऊन शिक्षकांचा सन्मान
उदगीर वार्ताहर – वाचन हे ज्ञानाचे स्त्रोत आहे. वाचनाचा हा अमूल्य संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असणारे , स्वतः वाचन करत वाचक संवाद वृद्धिंगत करण्यासाठी योगदान देणार्या शिक्षकांचा शिक्षक दिनाचे औचित्य साधून चला कवितेच्या बनात या चळवळीच्या वतीने वाचक मित्र शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
शिवाजीराजे पाटील मास्टर कोच नवी दिल्ली यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभ्यासू वक्ते डॉ हनुमंत भोपळे, नांदेड व शिवाजी महाविद्यालय उदगीरचे प्राचार्य डॉ. विनायक जाधव, शिक्षकनेते शिवाजी साखरे वाघ,माजी गट शिक्षणाधिकारी बालाजी बिरादार आणि मुख्य संयोजक अनंत कदम यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सुमित्रा वट्टमवार, प्राचार्य डॉ. विनायक जाधव, आदर्श केंद्रप्रमुख पांचाळ सूर्यकांत , गुंडप्पा पटणे, प्रा. बालाजी सुर्यवंशी आणि संगीता सोनाळे यांना वाचक मित्र शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
चला कवितेच्या बनात या चळवळीचे संयोजक प्रा. राजपाल पाटील, मुरलीधर जाधव, तुळशीदास बिरादार, हनुमंत म्हेत्रे, बालाजी सुवर्णकार, सुरेश वजनम, फोटोग्राफर मिटू पाटील, पत्रकार नावंदर, आकाश कांबळे, राजेंद्र एकंबेकर, आदींच्या उपस्थितीत वाचक संवाद कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला. शेवटी कु राघवी रामविलास नावंदर हिच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
