शालेय गुणवत्ता वाढीसाठी उदगीर, देवणी, जळकोट तालुक्यातील शाळांना संगणकासह अद्यावत तंत्रज्ञानाची आ.बनसोडे यांच्याकडून भेट – सर्जेराव भांगे
उदगीर (एल पी उगिले) : उदगीर विधानसभा मतदारसंघातील कार्यसम्राट माजी गृहराज्यमंत्री आमदार संजय बनसोडे यांनी केवळ आपल्या मतदारसंघाचाच नव्हे तर आपल्या मतदारसंघा शेजारी असलेल्या देवणी तालुक्यातील शाळांचा देखील विचार करून त्या शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साधन, साहित्य अभावी शाळांचा विकास थांबू नये. असा दूरदृष्टीकोन ठेवून उदगीर, देवणी, जळकोट या तिन्ही तालुक्यातील केंद्रीय शाळांना संगणक, प्रिंटर आणि झेरॉक्स मशीन उदगीर, देवणी, जळकोट तालुका शिक्षक पतसंस्थेच्या 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिले जाणार असल्याची माहिती या पतसंस्थेचे सर्वेसर्वा सर्जेराव भांगे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.
उदगीर, देवणी, जळकोट जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेची 44 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ही दिनांक 25 सप्टेंबर 2022 रोजी संपन्न होणार आहे. या सर्वसाधारण सभेमध्ये सदरील साहित्याचे वाटप माजी गृहराज्यमंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते व लातूर जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी डॉक्टर वंदना फुटाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सर्जेराव भांगे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे देवनी, उदगीर, तालुक्यातील जळकोट तालुका संपर्कप्रमुख तथा उदगीर तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेचे सचिव दूरदृष्टी नेतृत्व असलेले सर्जेराव भांगे यांनी महाराष्ट्राचे माजी गृह राज्यमंत्री तथा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय भाऊ बनसोडे यांना केंद्रीय मुख्याध्यापकांना विविध प्रकारच्या ऑनलाइन कामे करण्यासाठी तसेच विविध माहितीची कागदपत्रे झेरॉक्स करण्यासाठी शहराच्या ठिकाणी यावे लागते, यामध्ये वेळेचा अपव्यय होतो. तसेच अनेक ठिकाणी मनुष्यबळ कमी असल्यामुळे मुख्याध्यापकाची धावपळ होत असते. यासंदर्भात सविस्तर चर्चा करून आमदार बनसोडे यांच्याकडे यासंदर्भात मागणी केली असता, त्यांनी तात्काळ या मागणीची दखल घेऊन लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांना आपल्या आमदार फंडातून दहा लाख रुपयांची रक्कम कॉम्प्युटर, प्रिंटर व झेरॉक्स मशीन यासाठी मंजूर केली. व हे साहित्य उदगीर, देवणी, जळकोट तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दिवशी वाटप करण्यात येईल असे सांगितले.
उदगीर, देवणी, जळकोट तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या मासिक बैठकीत आणखीनही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
ज्यामध्ये प्रामुख्याने शिक्षक बांधवांच्या आर्थिक गरजा वाढल्याने नियमित कर्ज मर्यादा पंधरा लाखावरून 25 लाखापर्यंत करण्यात आली. तसेच शिक्षक बांधवांना प्लॉट खरेदी करण्यासाठी पाच लाख ते सात लाख रुपये पर्यंत विशेष कर्ज देण्याचे ठरले . उदगीर, देवनी, जळकोट तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थाने संपूर्ण जिल्हा भरात सर्वात जास्त विक्रमी 12 टक्के लाभांश देऊन एक आदर्श निर्माण केला आहे
लातूर जिल्ह्यातील सर्व कर्मचारी पतसंस्थेपेक्षा सर्वात जास्त लाभांश देणारी ही पतसंस्था ठरली आहे. नियमित कर्जाचा व्याजदर सभासदांची गरज ओळखून एक आक्टोबर 2022 पासून अर्धा टक्का कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सेवानिवृत्त शिक्षक सभासदांच्या विश्रामासाठी पतसंस्थेच्या इमारतीत सर्व सुविधायुक्त विश्रामगृह तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. नियमित कर्ज उचलणाऱ्या शिक्षक बांधवांना नवीन कर्ज उचलण्यासाठी उचललेल्या कर्जाच्या 50% रक्कम पगारीतून कपात करणे बंधनकारक होते, पण यावर्षीपासून सदरील नियम शिथिल करण्याचा प्रस्ताव जिल्हा बँकेला पाठवून मंजुरी घेण्याचा प्रयत्न चालू आहे.
लातूर जिल्ह्यातील कर्मचारी पतसंस्थेपैकी सर्वात मोठी स्वभांडवली पतसंस्था म्हणून उदगीर, देवणी, जळकोट जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था नावारूपाला आली आहे, याचे सर्व श्रेय शिक्षकांनी पतसंस्थेच्या संचालक मंडळावर ठेवलेला प्रचंड विश्वास व ठेवीचा विक्रम यामुळे पतसंस्थेला सर्वोच्च स्थानी बसविले आहे.
मागील चार वर्षांपूर्वी 22 कोटी रुपये जिल्हा मध्यवर्ती बँकेत कॅश क्रेडिट असताना सर्व सभासदांच्या विश्वासात पात्र राहून पतसंस्थेचे चेअरमन चंद्रकांत कांबळे आणि पतसंस्थेचे सचिव सर्जेराव भांगे, पतसंस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार काळे व पतसंस्थेच्या सर्व संचालकांनी एकजुटीने कार्य करून जिल्हा बँकेचे कॅश क्रेडिट पूर्णतः बेबाकी करून पतसंस्था स्वबळावर आणली आहे.
पुढील काळात पतसंस्थेत कोर बँकिंग प्रणाली चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पतसंस्थेच्या या यशामध्ये पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व संचालक, सर्व सभासद बांधव व उदगीर, देवणी, जळकोट तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यांचा सिंहाचा वाटा असल्याचेही सर्जेराव भांगे यांनी सांगितले.
कर्जाची वसुली हा पतसंस्थेचा आत्मा आहे. कर्ज वसुलीसाठी नियमितपणे सहकार्य करणारे देवणी, उदगीर व जळकोट तालुक्यातील गट विकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, प्रशाला मुख्याध्यापक, केंद्रीय मुख्याध्यापक यांच्या बद्दलही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ देवणी तालुक्याचे सरचिटणीस रवीकुमार बनवले यांनी ऋण व्यक्त केले आहे.
