अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयात क्रांतिवीर उमाजी नाईकांची जयंती साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीतील महत्त्वाचे नेते व आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती येथील महात्मा फुले महाविद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुरुड येथील संभाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र माळी यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे व अध्यक्षांच्या हस्ते क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. नरेंद्र माळी यांनी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या औचित्यावर नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर माहिती दिली. तसेच त्यांनी महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक करून लातूर जिल्ह्यात सर्वप्रथम महात्मा फुले महाविद्यालयाने सुरू केलेल्या मियावाकी प्रकल्पाची पाहणी केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
