लातूर पंचायत समितीचे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

लातूर पंचायत समितीचे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

विज्ञान प्रदर्शनात सुमारे १०७ नाविन्यपूर्ण प्रयोगांचे सादरीकरण

लातूर (प्रतिनिधी) : लातूर पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने दि. ७ व ८ सप्टेंबर २०२२ रोजी देशीकेंद्र विद्यालय लातूर येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ७ सप्टेंबर रोजी लातूर तालुक्याचे गटविकास अधिकारी तुकाराम भालके यांच्या अध्यक्षतेखाली व लातूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजय पंचगल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन समारोह संपन्न झाला. या विज्ञान प्रदर्शनामध्ये उच्च प्राथमिक गटामधून सुमारे ६८ शाळांनी सहभाग नोंदवला तर माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून सुमारे ३९ शाळांनी सहभाग नोंदवला होता. तसेच प्राथमिक शिक्षक अध्यापन साहित्य यामध्ये आठ शिक्षकांनी, माध्यमिक व प्रयोगशाळा सहायक यामधून प्रत्येकी एका शिक्षकांनी सहभाग नोंदवला.

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनास भेट देवून विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी वैज्ञानिक तत्व जाणून घेतले. तसेच या प्रदर्शनास तालुका व जिल्हा स्तरावरील अधिकारी यांनी भेटी देवून सहभागी बालकांचे कौतुक केले.

८ सप्टेंबर २०२२ रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. या बक्षिस वितरण समारंभासाठी पंचायत समिती लातूरचे गटविकास अधिकारी तुकाराम भालके, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य गिरी साहेब, लातूर तालुक्याच्या संपर्कप्रमुख तथा डायट मुरुडच्या गुणवत्ता कक्ष प्रमुख डॉ.भागीरथी गिरी तसेच उपशिक्षणाधिकारी (प्राथ.)भगवान फुलारी यांनी विज्ञान प्रदर्शनस्थळी आपला अमूल्य वेळ देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी देशिकेंद्र विद्यालयाचे मुख्याध्यापक सगर सर हे होते. यावेळी गविअ किरण कोळपे हेही आवर्जून उपस्थित होते. परीक्षक म्हणून सहा परीक्षकांनी सर्व प्रयोगांचे परीक्षणाचे काम केले.लातूर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन समारंभाच्या यशस्वीतेसाठी सर्व विस्तार अधिकारी, सर्व केंद्रप्रमुख, गट साधन केंद्रातील सर्व विषय साधन व्यक्ती विशेषतज्ञ, विशेष शिक्षक सर्व कार्यालयीन स्टाॅफ यांनी प्रचंड मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार लातूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी संजय पंचगल्ले यांनी व्यक्त केले.

About The Author