विद्यार्थ्यांनी पालकांच्या डोळ्यांतल्या भावना ओळखाव्यात – प्राचार्य डॉ. वसंत बिरादार

विद्यार्थ्यांनी पालकांच्या डोळ्यांतल्या भावना ओळखाव्यात - प्राचार्य डॉ. वसंत बिरादार

अहमदपूर (गोविंद काळे) : महाविद्यालयीन जीवन ही आयुष्याची सुंदर सुरुवात असून महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास, चिन्तन, मननाबरोबरच आपल्या आई- वडिलांच्या डोळ्यातल्या भावना वाचता आल्या तरच दोघांचेही हित होते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवप्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात अध्यक्षस्थानावरून प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे बोलत होते. यावेळी विचारमंचावर उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी व संयोजक ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, महात्मा फुले महाविद्यालयाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात गुणवत्तेचा नवा आदर्श निर्माण केला असून, आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व देतो. विविध सांस्कृतिक उपक्रमांतून विद्यार्थ्यांनी स्वतःला घडवावे व एन. एस. एस. च्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवावा. असे ही ते यावेळी म्हणाले.

या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते अहमदपूर नगर परिषदेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन व प्लास्टिक बंदी सप्ताह अंतर्गत घेण्यात आलेल्या निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. वक्तृत्व स्पर्धेत प्रज्ञा प्रेमानंद रायभोळे ही विद्यार्थिनी प्रथम आली असून ज्योत्सना नारायण मचकंटे ही द्वितीय तर वैष्णवी संभाजी नागरगोजे ही तृतीय आली आहे. निबंध लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक वैष्णवी जगदीश मंडले, द्वितीय क्रमांक ऐश्वर्या बालाजी बोरेवाड तर तृतीय क्रमांकाची मानकरी वैष्णवी संभाजी नागरगोजे ही विद्यार्थीनी ठरली. निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण डॉ. बब्रुवान मोरे, डॉ. मारोती कसाब व डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले. तसेच यावेळी उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी, डॉ. बब्रुवान मोरे, डॉ. पांडुरंग चिलगर, डॉ. प्रशांत बिरादार व अजय मुरमुरे यांनी विविध विभागांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अनिल मुंढे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. मारोती कसाब यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author