मराठी आत्मकथने सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाच्या वास्तवाचा परिपाक आहेत – डॉ. वंदना महाजन

मराठी आत्मकथने सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाच्या वास्तवाचा परिपाक आहेत - डॉ. वंदना महाजन

अहमदपूर (गोविंद काळे) : आत्मकथनातून लेखक स्वतःबरोबरच समाजाचाही इतिहास मांडत असतो.म्हणून आत्मकथन हा वाड्.मय प्रकार समकालीन समाजाचे वास्तव अधोरेखित करणारा महत्त्वाचा दस्तावेज असून, आत्मकथन म्हणजे समकालीन समाजाचा आणि सांस्कृतिक जीवनाचा परिपाक असलेला इतिहास होय , असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागप्रमुख डॉ. वंदना महाजन यांनी केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व किसान शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीर द्वारा संचलित महात्मा फुले महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात डॉ. वंदना महाजन बोलत होत्या. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते. तर किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्रीरंगराव पाटील व सचिव मा. ज्ञानदेव झोडगे गुरुजी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. ‘ नव्वदोत्तरी मराठी आत्मकथने: स्वरूप आणि चिकित्सा ‘ या विषयावर झालेल्या या चर्चासत्राचे बीजभाषण करताना डॉ. वंदना महाजन पुढे म्हणाल्या की, प्रबोधनाच्या हेतूने संतांनी आपल्या अभंगातून आत्मकथन मांडले. साठोत्तरी काळात दलित, स्त्रीवादी, आदिवासी विमुक्त भटक्यांसह ग्रामीण लेखकांनी सामाजिक वास्तव मांडले. मात्र अलीकडील काळातील लेखक आपल्या आत्मकथनांना कादंबरी म्हणावे असा आग्रह धरीत असून, लेखक सत्य बोलण्यासाठी का कचरत आहेत ? याचा विचार अभ्यासकांनी, समाजाने करण्याची गरज निर्माण झाली आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.

गुगल मीटवर झालेल्या या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन जर्मनी येथील सुप्रसिद्ध यु-ट्युबर जयलक्ष्मी आंबटवार यांनी केले. तर शोधनिबंध सत्राचे अध्यक्षस्थान सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते, अभिनेते व लेखक डॉ. दिनेश काळे (वसई) यांनी भूषविले. शोधनिबंध वाचन सत्रामध्ये मध्ये डॉ. दीपांजली लांडगे (कॅनडा), डॉ. नाथराव घरजाळे (अंबाजोगाई ) व डॉ. सविता पवार (मेहकर ) यांनी अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर करून बदलत्या मराठी आत्मकथनाच्या स्वरूपावर तीन तास दर्जेदार वैचारिक क्रांतीच्या सुगंधाने वाड्.मयीन मेजवानी दिली. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, मराठी आत्मकथनांनी देशाला आणि जगाला वास्तववादी साहित्याचा आदर्श घालून दिला आहे. दलित, स्त्रीवादी, आदिवासी, विमुक्त भटक्यांच्या आत्मकथनांनी संपूर्ण समाजाचे ज्वलंत प्रश्न मांडले आहेत. मात्र अजूनही समाजाचे विविध स्तर व्यक्त होणे बाकी असून, सर्वहारा वर्गातील वंचितांची आत्मकथने आली तर ती निश्चितच समाजाला दिशा देणारी ठरतील असेही त्यांनी यावेळी सांगितले. या चर्चासत्राचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय संयोजक डॉ. मारोती कसाब यांनी करून दिला. यावेळी ‘नव्वदोत्तरी मराठी आत्मकथने स्वरूप आणि चिकित्सा’ या ग्रंथाचे आभासी पद्धतीने जयलक्ष्मी आंबटवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. चर्चासत्राचे सूत्रसंचालन संयोजक डॉ. अनिल मुंढे यांनी केले तर आभारप्रदर्शन संशोधक विद्यार्थिनी वर्षा लगडे यांनी केले. कार्यक्रमाची सुरूवात डॉ. बब्रुवान मोरे यांच्या सुमधुर आवाजात वंदे मातरम् या गीताने करण्यात आली. या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात देश व विदेशातील २०० हून अधिक संशोधक, अभ्यासक, स्वा. रा. ती. म. वि. नांदेडच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्यांसह असंख्य विद्यार्थी, प्राध्यापक सहभागी झाले होते.

About The Author

error: Content is protected !!