नामदेव कदम मित्र मंडळाच्या वतीने पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम
लातूर (एल.पी. उगिले) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून स्वच्छता दूत आणि आरोग्य दूत म्हणून ज्यांची ओळख आहे. ते नामदेवराव कदम आणि त्यांच्या मित्र मंडळांनी 17 आणि 18 सप्टेंबर रोजी मंदिर स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. यासोबतच केवळ हे दोनच दिवस उपक्रम राबवून हे मित्र मंडळ थांबणार नाही, तर सेवा पंधरवाडा साजरा करून श्रमप्रतिष्ठा हे मूल्य समाजातील तरुणांच्या मनामध्ये रुजवणार आहेत.
याचाच एक भाग म्हणून नामदेवराव कदम मित्र मंडळ लातूरच्या वतीने बालाजी मंदिर जळकोट, दुधीया हनुमान मंदिर उदगीर, महादेव मंदिर देवणी, शिरूर आनंतपाळ येथील आनंदपाळ मंदिर, शिरूर ताजबंद येथील महादेव मंदिर, चाकूर येथील महादेव मंदिर, लातूर येथील सिद्धेश्वर मंदिर या मंदिरांची स्वच्छता मोहीम हाती घेतली जाणार आहे. तसेच हा परिसर सुंदर आणि स्वच्छ दिसावा, यासाठी शाश्वत विकासाचा भाग म्हणून वृक्षारोपणही मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. अशी माहिती नामदेवराव कदम मित्र मंडळाच्या वतीने संयोजन समितिने दिली आहे.
नामदेवराव कदम हे उदगीर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवार होते, मात्र सध्या त्यांनी जिल्हाभर कार्य सुरू केल्यामुळे ते लोकसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत की काय? अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.
वास्तविक पाहता उदगीर विधानसभा मतदारसंघ ही त्यांची खरी कर्मभूमी आहे. या भागातील कित्येक नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत. देशपातळीवरील दिव्यांगासाठी त्यांनी विविध शिबिरे घेऊन त्यांना कृत्रिम अवयव उपलब्ध करून दिले आहेत. त्यांची ही समाजसेवी प्रवृत्ती आणि नम्र स्वभाव यामुळे ते लातूर जिल्ह्यात लोकप्रिय आहेत. राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून जनसामान्यांची सेवा करावी, गोरगरिबांना आरोग्य सेवा देता यावी. या उदात्त हेतूने प्रेरित होऊन समाजसेवेला त्यांनी प्राधान्य दिले आहे. त्यांच्या एकूण कार्याकडे पाहिल्यास समाजातील उपेक्षित, शोषित, गोरगरीब, दिव्यांग यांच्यासाठी त्यांनी विशेष योजना राबवल्या आहेत.त्या मुळेच त्यांना आरोग्य दुत म्हणुन ओळखले जाते.
त्यांनी सुरू केलेली ही मोहीम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे जिल्हाभर चर्चिले जाते आहे.