सुनेगावकरांना ७५ वर्षांपासून बसची प्रतीक्षा !

सुनेगावकरांना ७५ वर्षांपासून बसची प्रतीक्षा !

देशभर स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा ; सुनेगावला ७५ वर्षांपासून बस आलीच नाही !अहमदपूर (गोविंद काळे) : देशभर नुकताच स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात आला तचेस केंद्रीय मंत्र्याकडून हवाई बसची घोषणा केली गेली परंतु तालुक्यातील सुनेगाव ( शेंद्री ) गावात ७५ वर्षात अजूनही बस पोहचली नाही . आज ना उद्या बस गावात येईल , अशी अपेक्षा ग्रामस्थ करीत आहेत . याबाबत त्यांनी वारंवार पाठपुरावा करून प्रशासन लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांना तब्बल ७ किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागत आहे .

एकीकडे नुकताच देशभर स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये, शहरी भागात, ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात धुमधडाक्यात साजरा करण्यात आला त्यातच काही दिवसापुर्वी केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी पुण्यात लवकरच हवाई बस सेवा सुरू करण्याची घोषणा केली परंतु अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव ( शेंद्री ) गावात भारत देश स्वातंत्र्य झाल्यापासुन आजपर्यत ७५ वर्षात बस पोहचली नाही या गावची लोकसंख्या हजाराच्या जवळपास आहे . ग्रामस्थांना बाहेरगावी जायचे असल्यास मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अहमदपूर शहरापासून केवळ ७ किमी अंतरावर हे गाव आहे. येथील नागरिकांना अहदपूरला एक तर पायी यावे लागते किंवा खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. गावातून जवळपास शंभर विद्यार्थी पायीच येजा करतात. बससेवेअभावी ग्रामस्थांना सात किलोमीटर पायी यावे लागते . एसटी महामंडळांकडून काही ठिकाणी जाण्यासाठी पक्के रस्ते नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. परंतु, बससेवा बंद असल्याने त्याचा फायदा खाजगी वाहनधारकांना होत आहे . विशेष म्हणजे या वाहनात क्षमतेपेक्षा अधिक अधिक प्रवासी बसविले जातात.

भाडेही जास्तीचे घेतले जाते. प्रवासी जीव धोक्यात घालून खाजगी वाहनाने प्रवास करतात. सुनेगाव बससेवा सुरू व्हावी , यासाठी ग्रामस्थांनी पाठपुरवा करूनही अद्याप कुणीच दखल घेतलेली नाही . गावात केवळ प्राथमिक शाळा आहे . पुढील शिक्षण घेण्यासाठी अहमदपूरला यावे लागते .बससेवा नसल्याने विद्यार्थ्यांना दररोज पायी जावे लागते . यातून शैक्षणिक नुकसान होत आहे . किमान ७० ते ८० विद्यार्थी दररोज सात किमी पायी चालतात.

चौकट : सुनेगाव (शेंद्री) गावात आजवर कधीच बस आली नाही . देशाला स्वातंत्र्य होवून ७५ वर्षे लोटली . ग्रामीण भागात भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले . रस्ते तयार झाले . वीज आली पण सुनेगावात अद्याप एकदाही राज्य परिवहन महामंडळाची बस आली नसल्याने ग्रामस्थांना उत्सुकता आहे . गेल्या अनेक वर्षांपासून बससाठी पाठपुरावा करणाऱ्या ग्रामस्थांना ना शासन प्रतिसाद देते आहे ना लोकप्रतिनिधी प्रतिसाद देतात.

चौकट : -शाळकरी विद्यार्थी त्रस्त : सरपंच • गावात बस सुरू करावी , अशी अनेक दिवसांपासून मागणी आहे . मात्र, ना राज्य परिवहन महामंडळ याची दखल घेतोय ना येथील प्रशासन, जवळपास ७० ते ८० विद्यार्थी गावातून दररोज अहमदपूरला शाळेसाठी पायी येजा करतात . ग्रामस्थांना बाहेरगावी जायचे असल्यास सात किलोमिटर पायी जावे लागते. स्वातंत्र्याची ७५ वर्षे लोटली केंद्रीय मंत्र्याकडून पुण्यात हवाई बसची घोषणा तरी आम्हा ग्रामस्थांचा वनवास कायम आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ बससेवा सुरु करावी, असे सरपंच सौ उषा गोपीनाथ जायभाये यांनी सांगितले.

About The Author