नव्या पिढीसमोर महापुरुषांचा इतिहास येणे गरजेचे निवृत्ती सांगवे (सोनकांबळे)

नव्या पिढीसमोर महापुरुषांचा इतिहास येणे गरजेचे निवृत्ती सांगवे (सोनकांबळे)

उदगीर (एल. पी. उगिले) : ज्या ज्या महापुरुषांनी समाजाच्या प्रगतीसाठी, विकासासाठी स्वार्थ बाजूला ठेवून सामाजिक बांधिलकी समजून कार्य केले. अशा महापुरुषांची आठवण आणि त्यांचा इतिहास नव्या पिढीच्या समोर ठेवणे गरजेचे आहे, असे विचार राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी नियोजन व विकास सभापती नगरपरिषद उदगीरचे निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांनी व्यक्त केले.

ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. सोमनाथपूर ग्रामपंचायत आणि बहुजन विकास अभियान यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्याप्रसंगी बहुजन विकास अभियानचे प्रमुख संजय कुमार, सोमनाथपूरचे सरपंच राम पाटील, मानसिंग पवार, विकास सूर्यवंशी, संजय राठोड, मानकरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी संजय कुमार यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणातून स्पष्ट केले की, शिक्षणाची गंगोत्री बहूजन समाजापर्यंत पोहोचवणारे आधुनिक भगीरथ म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याकडे पाहिले जाते. शैक्षणिक क्रांती हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून जात,पात, धर्माचे अडथळे दूर करून बहुजनांच्या घरात ज्ञानाचा दिवा पेटवण्याचे काम करतानाच स्वातंत्र्य चळवळीला देखील त्यांनी मोठा आधार दिला होता. बहुजनांच्या विकासासाठी रयत शिक्षण संस्थेची उभारणी करून गोरगरिबांच्या मुलांसाठी शिक्षणाचे दारे खुले केली. हा इतिहास वेळोवेळी तरुणांना सांगणे गरजेचे आहे. असे स्पष्ट केले.

पुढे बोलताना निवृत्ती सांगवे (सोनकांबळे) यांनी सांगितले की, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या बहुजन समाजाला शिक्षणाची आवड निर्माण व्हावी. यासोबतच समता, बंधुता, श्रम प्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी या मूल्यांची रुजवन बहुजन समाजातील तरुणांमध्ये रुजवली जावी. यासाठी भाऊराव पाटील यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. या स्वाभिमानी कर्मवीरांची आठवण नव्या पिढीला ठेवलीच पाहिजे. कारण आज बहुजन समाजातील उच्चपदस्थ जे तरुण दिसत आहेत, त्याचा पाया कर्मवीरांनी रचला आहे. अशा महामानवाला समाजातील सर्व घटकांनी कायम स्मरणात ठेवले पाहिजे, असेही सांगितले.

About The Author

error: Content is protected !!