राष्ट्रीय सेवा योजनेतून व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो – प्रोफेसर अनिल मुंढे
अहमदपूर (गोविंद काळे) : राष्ट्रीय सेवा योजना हे युवकांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्वाचे व्यासपीठ आहे, यातून खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. असे, प्रतिपादन अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रो. डॉ.अनिल मुंढे यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाची उपप्राचार्य प्रो. डॉ.दुर्गादास चौधरी हे होते. तर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रो. डॉ.अनिल मुंढे यांच्यासह विचार मंचावर कार्यक्रमाचे संयोजक डॉ. पांडुरंग चिलगर उपस्थित होते. पुढे बोलताना प्रो. डॉ.मुंढे म्हणाले की, श्रमाचे महत्व, स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रसेवेची संधी आणि समाज प्रबोधनाची संधी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांना प्राप्त होते. हेच खऱ्या अर्थाने राष्ट्रीय कार्य आहे. यातूनच मानवता धर्म जोपासला जातो. असे ही, ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपाप्रसंगी उपप्राचार्य प्रो.डॉ.दुर्गादास चौधरी यांनी राष्ट्रीय सेवा योजना ही सामाजिक व राष्ट्रीय नीतिमूल्यांची शिकवण देते असे, ते म्हणाले. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांना एन.एस.एस. डायरीचे वाटप करण्यात आले. तसेच, महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयातील हनुमंत देवकते यांच्या मातोश्री चे दुःखद निधन झाल्याबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक डॉ.पांडुरंग चिलगर यांनी केले. सूत्रसंचालन सहा. कार्यक्रमाधिकारी डॉ. सतीश ससाणे यांनी तर आभार कु. वैष्णवी मंडले हिने मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
