सांस्कृतिक विविधतेत एकता हीच भारताची जगात ओळख – डॉ.पुष्पिता अवस्थी
अहमदपूर (गोविंद काळे) : भाषा आणि संस्कृतीवर भौगोलिक वातावरणाचा प्रभाव असतो, भौगोलिक वातावरणात सांस्कृतिक जनजीवनाची जडणघडण होते. भौगोलिक दृष्ट्या भारताची संस्कृती व भाषा यात विभिन्नता दिसून येते. सांस्कृतिक विविधतेत एकता हीच भारताची जगात खरी ओळख आहे. असे, स्पष्ट प्रतिपादन नेदरलँड येथील हिंदी युनिव्हर्सल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. पुष्मिता अवस्थी यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत असे की, ग्लोबल संस्कृत फोरम दिल्ली, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर च्या भूगोल विभागाच्या वतीने आयोजित एक दिवशीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. या आंतरराष्ट्रीय ई – चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील होते. तर, विशेष उपस्थितीत किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर व सचिव ज्ञानदेव झोडगे गुरुजी यांची उपस्थिती होती. तसेच बीजभाषक म्हणून दिल्ली विद्यापीठातील भूगोल विषयाचे प्रा. डॉ. बिंदे वासिनी पांडे हे उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. पुष्पिता अवस्थी म्हणाल्या की, लोक संस्कृतीला समजण्यासाठी लोकगीतांचा आधार घेतला जातो, त्या लोकगीतातूनच खऱ्या अर्थाने या भौगोलिक क्षेत्राची माहिती मिळते. तेथील संस्कृती व लोकांची खानपान पद्धती, वेशभूषा याची ओळख होते. असे ही त्या म्हणाल्या.
या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या द्वितीय सत्र स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. मंजुनाथ मानकरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. यावेळी अभिजीत धुळगुंडे फलटण, डॉ. प्रवीण ठाकरे औरंगाबाद, अनिल वाघ केज, डॉ.मृदुला शर्मा अमरावती, डॉ. जितेंद्र घोडके नांदूरघाट यांनी प्रातिनिधिक स्वरूपात शोधनिबंधाचे वाचन केले.या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या अध्यक्षीय समारोपा प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, भाषा आणि संस्कृतीचा परस्पर संबंध आहे, त्यांच्यावर भौगोलिक परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो. म्हणूनच भारतात सांस्कृतिक व भाषिक विभिन्नता पहावयास मिळते. परंतु, हीच खरी भारताची ताकद आहे. असेही ते म्हणाले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत ‘सांस्कृतिक भूदृश्यावरील भौगोलिक परिस्थितीचा प्रभाव ‘ या शोधनिबंध ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख डॉ.दिगंबर माने यांनी केले तर सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.बब्रुवान मोरे यांनी तर आभार डॉ.सचिन गर्जे यांनी मानले. यावेळी देश -विदेशातून दोनशेहून अधिक अभ्यासक, प्राध्यापक तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
