शहर आजार मुक्त व सुंदर करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन करा – उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांचे प्रतिपादन
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर शहराने शिक्षण क्षेत्रामध्ये चौफेर यश कमावले आहे. त्याप्रमाणे शहर आजार मुक्त सुंदर व गुणवत्ता पूर्ण करण्यासाठी सर्व प्रभागांमध्ये प्लॅस्टिक बंदी आणि घनकचरा व्यवस्थापन शक्तीने करा असे आग्रही प्रतिपादन उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांनी केले. ते दि. 17 रोजी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत नगरपरिषदेच्या वतीने प्लॅस्टिक बंदी व घनकचरा व्यवस्थापन प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेवक एडवोकेट अमित रेड्डी, माजी नगरसेवक डॉ. सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी, माजी नगरसेवक राहुल शिवपुजे, उपक्रम शिल शिक्षक रामलिंग तत्तापूरे, नगर परिषदेचे अधिक्षक सतीश बिलापट्टे ,अभियंता गणेश पुरी, विजय माने सह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी तहसीलदार श्री प्रसाद कुलकर्णी म्हणाले की, शहरातील प्रत्येक प्रभागा मधील घराघरांमध्ये ओला व वाळलेला कचरा वेगळा करून नगरपरिषदेच्या घंटागाडी मध्ये वेळेत टाकावा असे जाहीर आवाहन केले. कार्यक्रमाचा शुभारंभ मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकाच्या दीपस्तंभाला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी सूत्रसंचलन राहुल चव्हाण यांनी तर आभार मुसा शेख यांनी मानले. आज दिवसभर सदरचे प्रदर्शन शहरवासी यांना खुले करण्यात आले आहे. प्रदर्शन पाहून त्याप्रमाणे नागरिकांनी घनकचरा व्यवस्थापन व कचरा वर्गीकरण करावा. हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
