सोमनाथपूर मधील अवैध दारूबंदीसाठी महिलांचा आमदारांसमोर आक्रोश !
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर शहर व परिसरातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे राजरोसपणे खुलेआम सुरू आहेत. सोमनाथपूर मध्ये अवैध दारू विक्रीच्या विरोधात शनिवारी ( दि. २४ ) अनेक महिलांनी अवैध दारू विक्री बंद करावी अशी मागणी करत उदगीर पोलिसांच्या व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांच्या विरोधात आक्रोश करीत तीव्र संताप व्यक्त केला.
उदगीर शहर व ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे बोकाळली आहेत. या अवैध धंद्यांकडे पोलीस प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची तक्रार शनिवारी सोमनाथपूर येथील महिलांनी माजी राज्यमंत्री आमदार संजय बनसोडे यांच्याकडे केली. सर्वत्र खुलेआम व राजरोसपणे अवैध धंदे बोकाळली आहेत. अवैध दारूच्या दुकाने खुलेआम सुरू असल्याने कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहे. त्याचबरोबर तरुण , लहान बालके दारूच्या आहारी जात असल्याचे महिलांनी आमदार बनसोडे यांना सांगितले. सर्वत्र खुलेआम अवैध दारूची दुकाने सुरू असूनही याकडे उदगीर पोलिसांचे आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नेहमीच दुर्लक्ष राहिलेले आहे.
उदगीर शहर व परिसरातील अनेक भागांमध्ये मोलमजुरी करून उपजीविका भागविणारे अनेक कुटुंब आहेत. अशा भागात अवैध दारू विक्रीची दुकाने खुलेआम व राजरोसपणे सुरू सुरू आहेत. दिवसभर काबाडकष्ट करणारे मजूर अवैध दारूच्या दुकानात जाऊन व्यसनाधीन झालेले आहेत. लहान बालकेही दारूच्या व्यसनाच्या विळख्यात सापडत असल्याची तक्रार यावेळी आमदार संजय बनसोडे यांच्याकडे महिलांनी केली. अवैध दारू विक्रीकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी , अवैध दारू विक्रीची दुकाने तात्काळ बंद करण्यात यावीत अशी मागणी महिलांनी आमदार बनसोडे यांच्याकडे केली आहे.
