उदगीरात पोलीस प्रशासन सुस्त; बेशिस्त वाहतुकीचा बोजवारा !

उदगीरात पोलीस प्रशासन सुस्त; बेशिस्त वाहतुकीचा बोजवारा !

चौका – चौकात वाहतुकीची कोंडी : नागरिक त्रस्त

उदगीर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या ऐतिहासिक उदगीर शहरातील बेशिस्त वाहतुकीमुळे सर्वसामान्य माणसांचा जीव गुदमरत चाललेला आहे. उदगीर शहर पोलिसांच्या सुस्त कार्यप्रणालीमुळे उदगीर शहरात बेशिस्त वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. परिणामी शहरातील बेशिस्त वाहतुकीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. बेशिस्त वाहतुकीमुळे वैतागलेल्या नागरिकांतून शहर पोलिसांच्या निष्क्रिय कार्यपद्धतीबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

उदगीर शहरातील मुख्य रस्त्यावर बेशिस्त वाहतुकीमुळे होणारी नेहमीचीच कोंडी यामुळे उदगीरकरांचा जीव गुदमरत चाललेला आहे. या अनुषंगाने गेल्या आठ महिन्यांपूर्वी दिनांक २४ जानेवारी रोजी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या पुढाकारातून राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली वाहतूक संबंधित आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत नागरिकांनी राज्यमंत्री बनसोडे यांच्यापुढे बेशिस्त वाहतुकीच्या समस्यांचा आणि शहर पोलिसांच्या निष्क्रिय कार्यपद्धतीचा पाढा वाचला होता. त्यावेळी बैठकीसाठी जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज , जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे , प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार , उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी , सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एम.एम. पाटील , उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल जॉन बेन हे प्रशासनातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये बेशिस्त वाहतुकीमुळे होणारी कोंडी याबाबत नागरिकांनी समस्या मांडून उपाययोजना करण्याची मागणी केली होती. उदगीर शहरातील अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची थांबे शहराबाहेर करण्यात यावीत, ऑटोरिक्षा साठी पॉईंट निर्माण करण्यात यावेत, हातगाडीवाले, भाजीपालावाले यांना रस्त्यावर बसू देण्यात येऊ नये, विना परमिट प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षाविरुद्ध कारवाई करण्यात येऊन शहरातील वाहतुकीस शिस्त लावण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती. त्यावेळी बैठकीत नगरपालिकेचे प्रशासक तथा उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी आणि तत्कालीन मुख्याधिकारी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी उपाययोजना करून मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून बसणाऱ्या भाजीपाला विक्रेते , हातगाडीवाले यांना हटवून रस्त्याच्या कडेला बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. तर शहरातील मुख्य रस्त्यावर पार्किंग व नो पार्किंग झोन तयार केले , शहरातील छत्रपती शाहू महाराज चौकात असलेले खाजगी ट्रॅव्हल्सचे पॉईंट तेथून हटवून बिदर रोड येथील उड्डाण पुलाच्या जवळ स्थलांतरित केले. त्या बैठकीत शहरातील बसस्थानकाच्या जवळ असलेले देगलूर रोड , बिदर रोड आणि मुख्य रस्त्यावरील अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे पॉईंट बंद करून शहराबाहेर वाहने उभी करण्यास प्रशासनाच्या वतीने पोलिसांना सांगण्यात आले होते. त्यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल जॉन बेन यांनी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे थांबे बंद करून वाहनांना गावाबाहेर काढले होते. त्या बैठकीच्या आठ महिन्यानंतर उदगीरच्या वाहतूक व्यवस्थेत किंचितही सुधारणा झालेली नाही. दररोजच्या बेशिस्त वाहतुकीच्या कोंडीमुळे उदगीरचे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. बेशिस्त वाहतुक सुरळीत करण्यासाठी उपाय योजना करण्याऐवजी निव्वळ बढाया मारण्याच्या प्रवृत्तीबद्दल नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्याविरुद्ध कारवाई का नाही ?

उदगीर शहरातील बसस्थानक परिसरातून अहमदपूर , जळकोट , देवणी , मुक्रामाबाद , कर्नाटकातील भवानी दापका , होकरणा , भालकी , कमलनगर आदी ठिकाणी अवैध प्रवासी वाहतूक करणारे शेकडो वाहने आहेत. क्षमतेपेक्षा अधिक सदर वाहनांमध्ये मर्यादेपेक्षा अधिक प्रवासी खचाखच भरून धोकादायक अवैध प्रवासी राजरोस व खुलेआमपणे सुरू आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणारी खाजगी क्रुझर जीप्स , काळी पिवळी जीप्स , टमटम असून विविध मार्गावर नियमितपणे प्रवासी वाहतूक केली जाते. या वाहनांचे पॉईंट बसस्थानक परिसरात असून मर्यादेपेक्षा जास्त क्षमतेने भरून प्रवासी घेऊन जातात. याकडे शहर पोलिसांचे दुर्लक्ष कसे काय ? नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कारवाई का होत नाही ? असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे. त्याचबरोबर उदगीर शहरात विनापरवाना ऑटोरिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात असूनही विनापरवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षा कसे सुरू आहेत ? याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

ऑटोरिक्षा पॉईंटची अंमलबजावणी नाही

नगरपालिकेचे प्रशासक तथा उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी येथील न्यायालयासमोर आणि बसस्थानकासमोर ऑटोरिक्षा पॉईंट निर्माण केलेले आहे. ऑटोरिक्षा पॉईंट असूनही भररस्त्यात वेडीवाकडी ऑटोरिक्षा उभी करून प्रवासी वाहतूक केली जाते. शहर पोलिसांकडून ऑटोरिक्षा पॉईंटची अंमलबजावणी करण्यात आली नसल्याने त्या ठिकाणी अनेकांनी अतिक्रमण केलेले आहे. पालिकेने उपाययोजना करूनही पोलिसांच्या निष्क्रियपणामुळे ऑटोरिक्षा चालक भररस्त्यात ऑटो उभा करून प्रवासी वाहतूक करतात.

About The Author

error: Content is protected !!