शासकीय योजनेचा आधार घेऊन आधुनिक शेती करावी – तालुका कृषी अधिकारी नाबदे
उदगीर (एल.पी.उगीले) : केंद्र व राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचनाच्या विविध योजना सुरू आहेत, या योजनेचा वापर करून शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेती करावी. असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे यांनी केले आहे.
देवर्जन येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष दयानंद रोडगे अध्यक्ष स्थानी होते.
यावेळी सोलापूर विभागाचे कृषी उपसंचालक राजकुमार मोरे, जिल्हा बँकेच्या देवर्जन शाखेचे व्यवस्थापक शंकरराव पात्रे, गट सचिव संघटनेचे उदगीर तालुका अध्यक्ष पी एस भंडे, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मदनराव धुमाळ, सोसायटीचे उपाध्यक्ष गजानन कोंपले, शंकर रोडगे, ईश्वर खटके, चंद्रप्रकाश खटके, सोसायटीचे गटसचिव रामभाऊ बिरादार आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी नाबदे म्हणाले, विविध कार्यकारी सोसायटी ही शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात येते. यातून विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेती करण्याकडे युवकांनी लक्ष देणे आवश्यक बनले आहे. पोखरा योजनेच्या माध्यमातून तरुण शेतकऱ्याने शेततळे, सूक्ष्म सिंचनाच्या योजना, गोदाम माल प्रक्रिया उद्योग उभारावेत. गटशेतीच्या माध्यमातून वेगवेगळे उत्पादन वाढीचे प्रयोग साकारण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा.
यावेळी मोरे म्हणाले, येत्या काळामध्ये रासायनिक खते व औषधांचा वापर कमी करून शेणखत वापरण्याकडे शेतकऱ्यांनी भर द्यावा. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी शेतकऱ्यांनी करणे आवश्यक बनले आहे.
यावेळी माजी सरपंच शिवाजीराव साकोळकर, सोसायटीचे माजी अध्यक्ष वैजनाथ रोडगे, नागनाथ रोडगे, सूर्यकांत रोडगे, शिवाजीराव लवटे, तुकाराम खटके, वाघंबर गडदे, फारुख शेख, बालाजी कांबळे, प्रा डॉ बस्वराज धोतरे, संग्राम रोडगे, संजय हाडोळे, शिवहार रोडगे, बस्वराज उमाटे, गंगाधर गरीबे, संतोष रोडगे, वैजनाथ वाडीकर, दत्ता खटके, गुरुबस बरगे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी उत्कृष्ट शेती करणाऱ्या शेतकरी व जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षकाचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संचालक राजकुमार गरिबे, तानाजी रोडगे, सलीम शेख, रमेश येमले, बालाजी कांबळे, पिराजी भोजणे, गोविंद वाडीकर, व्यंकट खटके, युवराज धोतरे, चंद्रकांत मोरे आदींनी पुढाकार घेतला.
