संभाजीराव शिवसेनेचा नाद करायचा नाय!!!
लातूर (प्रतिनिधी) : उध्दव ठाकरे यांच्याविषयी बोलताना आ. संभाजीराव पाटील निलंगेकरांनी आपली उंची अगोदर पहावी. उगीचच कुठेही मुका घेऊ नये. कोण शिल्लक राहील, याची चिंता वाड्यातून कुजबूज करून काँग्रेसच्या मदतीने निवडून येणार्यांनी करु नये. संभाजीरावांना चिंता मंत्रीपदाची आहे. मात्र कितीही सोंग केली, तरी देवेंद्र फडणवीस आता जवळ करणार नाहीत, हे लक्षात आल्याने त्यांनी निदान आपल्या धडपडीकडे पाहावे, यासाठी शिवसेना व उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची धडपड संभाजीरावांनी चालविलेली दिसतेय. पण, शिवेसेनेचा नाद करायचा नाय! काँग्रेसच्या मदतीने आमदार म्हणून निवडून येणार्याने आम्हाला शहाणपणा शिकवू नये, असा इशारा राज्य बाजार समिती संघाचे उपसभापयी संतोषभाऊ सोमवंशी यांनी एका पत्रकान्वये दिला आहे.रविवारी आ. संभाजीराव पाटील निलंगेकरांनी एका पत्रकातून शिवसेना, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे तसेच काँग्रेसवर टीका केली, असे सांगत सोमवंशी म्हणतात, शिवतीर्थावर दसरा मेळावा काही यंदा पहिल्यांदाच होत नाही त्यामुळे शिवसैनिक त्यासाठी समर्थ आहेत ज्यांचा पहिल्यांदा मेळावा होणार आहे, त्यांच्यासाठी तुमची टीम सगळी तयारी करीत आहे, हे आम्हालाच नव्हे, तर तमाम महाराष्ट्राला व जिल्ह्याला ठाऊक आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीबाबत बोलण्याचा अधिकार तर तुम्हाला नाहीच, असे ठणकावत सोमवंशी म्हणाले की, आपल्या आजोबांच्या आशीर्वादाने काँग्रेसशी तडजोड करीतच तुम्ही आमदार झालात, हे जिल्ह्याला ठाऊक आहे. तर ज्या राष्ट्रवादीविषयी आपण नाक मुरडताहात राष्ट्रवादीसोबत भल्या पहाटे शपथविधी घेताना तुमचे हिंदुत्त्व काय शेपूट घालून बसले होते काय ?असा सवालही त्यांनी केला. काँग्रेसच्या यात्रेसाठी सैनिकांची कुमक देण्याचा उल्लेख करुन अजूनही शिवसेनेकडे कुमक आहे. हे आपण मान्यच केले आहे. त्यामुळे लोकांचे व फडणवीसांचे मनोरंजन करणार्या पत्रावळ्या माध्यमातून देऊन तुम्ही हसे करून घेतले आहे. तुम्ही निलंग्यात राहून दिल्ली आणि मुंबईच्या गप्पा मारु नका, त्यापेक्षा उदगीर आणि अहमदपूर विधानसभांमध्ये तुमच्या पक्षाच्या उमेदवारांना कोणी पाडले, याचा गौप्यस्फोट करा, अशी घणाघाती टीकाही संतोषभाऊ सोमवंशी यांनी केली.