4 लाख 79 हजार 920 मुला-मुलींना जंतनाशक गोळया देणार – डॉ. गंगाधर परगे

4 लाख 79 हजार 920 मुला-मुलींना जंतनाशक गोळया देणार - डॉ. गंगाधर परगे

जिल्ह्यात 1 व 8 मार्च रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबवली जाणार

लातूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय जंतनाशक मोहीम जिल्ह्यात दिनांक 1 मार्च 2021 व माँपअप राउंड 8 मार्च 2021 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील 1 ते 19 वर्षे वयोगटातील शासकीय व खाजगी शाळा, अंगणवाडीतील विद्यार्थी तसेच शाळा बाह्य मुला-मुलींना असे एकूण 4 लाख 79 हजार 920 मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील शाळा व अंगणवाडी मध्ये एका निश्चित दिवशी वर्षातून दोनदा मोहीम घेण्यात येते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मातीतून प्रसार होणार्‍या कृमीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार आहे; म्हणूनच जास्तीत जास्त लाभार्थीपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम मार्च 2021 या महिन्यात आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. परगे यांनी दिली.
राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेमध्ये 1 वर्ष ते 19 वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळी खाऊ घालून त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. सर्व शासकीय व अनुदानित शाळा, आश्रम शाळा, महापालिका शाळा व खाजगी शाळेमधील पहिली ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत, असे ही डॉ. परगे यांनी म्हंटलं.
शाळाबाह्य मुला-मुलींना आशा वर्कर मार्फत जंतनाशक गोळी खाऊ घालण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात सरकारी व खाजगी शाळांची संख्या 2 हजार 11 असून या शाळेतील एकूण 3 लाख 27 हजार 519 मुलांना जंतनाशक गोळ्या शिक्षकांमार्फत खाऊ घालण्यात येणार आहेत. अंगणवाडीतील 1लाख 49 हजार 382 मुलांना जंतनाशक गोळी खाऊ घालावयाच्या आहेत. तसेच शाळाबाह्य 2 हजार 936 मुलांना आशा सेविका मार्फत जंतनाशक गोळी खाऊ घालावयाच्या आहेत. जिल्ह्यात एकूण 4 लाख 79 हजार 920 मुला-मुलींना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. तरी लातूर जिल्ह्यातील सर्व संबंधित विद्यार्थी मुलं-मुली यांनी जंतनाशक गोळी घेऊन या मोहिमेत सहभागी व्हावे व आपलं आरोग्य उत्तम ठेवावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहे.

About The Author