संत रविदासांच्या समतावादी विचारांची भारताला गरज – प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांचे प्रतिपादन
अहमदपूर (गोविंद काळे) : ‘ऐसा चाहू राज मै जहां मिले सबन को अन्न, छोटा बडा सब सम बसे, रविदास रहे प्रसन्न’ अशा ओळी लिहून भारतभर समतेची अध्यात्मिक चळवळ चालविणाऱ्या संत रविदास यांच्या विचारांची देशाला आज आवश्यकता असून, त्यांच्या स्वप्नातील समतावादी भारत निर्माण करण्याची गरज आहे ” असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले.
येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या रविदास जयंती महोत्सव समारंभात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.डी. डी. चौधरी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, मध्ययुगीन काळात भारतभर ज्या भक्ती चळवळी सुरू होत्या, त्यापैकी रविदासांची चळवळ संपूर्ण जगाला प्रेम, अहिंसा शिकविणारी होती. म्हणूनच त्यांचा अनुयायी वर्ग संपूर्ण जगामध्ये दिसून येतो. असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व सहाय्यक प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.