भाषा ही जशी ओठांतून येते, तशीच ती पोटातूनही आली पाहिजे – प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांचे प्रतिपादन

भाषा ही जशी ओठांतून येते, तशीच ती पोटातूनही आली पाहिजे - प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांचे प्रतिपादन

अहमदपूर (गोविंद काळे) : ग्रामीण भागातील बोलींनीच मराठी भाषा समृद्ध केली असून, जोपर्यंत शेतकरी- कष्टकरी मराठी माणूस जिवंत आहे; तोपर्यंत मराठीला मरण नाही. मात्र जागतिक बहुभाषिक परिस्थितीमध्ये मराठी भाषा टिकवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. मराठीचे अस्सल रूप जतन करणे गरजेचे आहे. भाषा मग ती कोणतीही असू देत ती जशी ओठातूनतून येते तशीच ती पोटातून आली पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील ख्यातनाम ललित लेखक, समीक्षक व प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांनी केले. येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुन प्राचार्य डॉ. वसंत बिरादार ते बोलत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर, डॉ. अनिल मुंढे, डॉ. मारोती कसाब हे उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, मराठी भाषेमध्ये आज दररोज किमान दोन हजार ग्रंथ प्रकाशित होतात. किमान दरवर्षी अडीचशे कोटी रूपयांचा आर्थिक उलाढाल दरवर्षी मराठी साहित्य क्षेत्रात होते. एकअखिल भारतीय पातळीवर मराठीचे संमेलन होते; तसेच एक वैश्विक पातळीवरही मराठी साहित्य संमेलन भरते. तसेच इतर ग्रामीणसह, दलित, आदिवासी, मुस्लिम या साहित्यासह २००साहित्यसंमेलने दरवर्षी भरतात.५००दिवाळी अंक प्रकाशित होतात. जगातील मानांकनात ती १५ व्या क्रमांकाचीभाषां आहे. तर भारतात ४थ्या क्रमांकाची भाषा आहे.महाराष्ट्रात १०कोटी लोक मराठी भाषा बोलतात. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्राचीनता, प्रगल्भता आणि सलगता या निकषाची आवश्यकता आहे.हे तीनही निकष पूर्ण करणाऱ्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळू नये, हे राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणाचे आणि मराठी माणसाच्या भांडखोर स्वभावाचे लक्षण आहे. जागतिक क्षेत्रात मराठीतील अनेक ग्रंथ भाषांतरित होत असून, देशातील अनेक विद्यापीठांमध्ये मराठी शिकविली जाते. या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, ” असेही ते म्हणाले.

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘आविष्कार’ या भित्तीपत्रकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, डॉ. पांडुरंग चिलगर आणि डॉ.मारोती कसाब यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनिल मुंढे यांनी केले तर सूत्रसंचालन कु.संजीवनी येडले हिने केले. आभार कु.पूजा देशमुख हिने मानले. या वेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author