महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पोवाड्यातून जागविला छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास…!
अहमदपूर (गोविंद काळे) : नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने ग्रामीण पाॅलिटेक्निक टेक्निकल कॉलेज नांदेड येथे सुरू असलेल्या विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवात पोवाडा सादर करीत आपल्या दमदार शाहिरी ने छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास जागविला. याबाबत अधिक माहिती अशी की, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कला गुणांना वाव देण्यासाठी दर वर्षी युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून, या वर्षीचा ‘ राष्ट्र चेतना युवक महोत्सव-२०२२’ ग्रामीण पाॅलिटेक्निक महाविद्यालयात सुरू आहे. या महोत्सवाचा पहिला दिवस महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गाजविला. लोककवी वामनदादा कर्डक मंचावर महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला. यामध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनातील शौर्य व पराक्रमाच्या प्रसंगांचे शाहीरी थाटात विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्याचा प्रसंग विद्यार्थ्यांनी खास आवेशात सादर केला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या संकल्पनेतून तयार केलेल्या या पोवाड्याचे सादरीकरण कु. विश्वनंदा नंदवंशी, कु. वैष्णवी स्वामी, कु. संघर्षा गायकवाड या विद्यार्थ्यांनी केले. यावेळी त्यांना राजेंद्र सोनकांबळे, दत्ता सोनकांबळे, साक्षी सोनकांबळे यांनी संगिताची साथ दिली. या विद्यार्थ्यांना संघ प्रमुख डॉ. अनिल मुंढे, डॉ. मारोती कसाब, डॉ.सतीश ससाणे, सौ. सीमा गीते, डॉ. अभिजीत मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
