युवक महोत्सवात महात्मा फुले महाविद्यालयाच्या लावणीला प्रेक्षकांनी दिला उदंड प्रतिसाद

युवक महोत्सवात महात्मा फुले महाविद्यालयाच्या लावणीला प्रेक्षकांनी दिला उदंड प्रतिसाद

अहमदपूर (गोविंद काळे) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवात महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मराठमोळ्या लावणी नृत्याला रसिक श्रोत्यांनी ताल आणि ठेका धरीत अलोट गर्दीसह उदंड प्रतिसाद दिला. याबाबत अधिक माहिती अशी की नांदेड येथील ग्रामीण पाॅलिटेक्निक तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठस्तरीय ‘ राष्ट्रचेतना युवक महोत्सव – २०२२’ सुरू असून या महोत्सवाचा दुसरा दिवस अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘ लावणी’ या कलाप्रकारात ” मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा अन् इष्काचा गुलकंद खिलवा ” हे लावणी नृत्य सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळवत गाजवला. महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या संकल्पनेतून विद्यार्थी कलावंतांनी या अप्रतिम लावणी गीताचा नृत्याविष्कार सादर केला. लोकशाहीर वामनदादा कर्डक मंचावर विद्यापीठ परीक्षेत्रातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी कलावंतांनी आपले लावणी नृत्य पेश केले.यावेळी महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या लावणीला उपस्थित रसिक श्रोत्यांनी सूरतालासह ठेका धरीत उदंड प्रतिसाद दिला. लावणी कलावंतांच्या गीताला आणि नृत्याला मंचासमोरील उपस्थित रसिक प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात भरभरून प्रतिसाद दिला. या लावणी कलाप्रकारात विश्वनंदा नंदवंशी, वैष्णवी स्वामी आणि संघर्षा गायकवाड या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कलावंत विद्यार्थ्यांना संघप्रमुख डॉ. अनिल मुंढे, डॉ. मारोती कसाब, प्रा. सीमा गीते आणि डॉ. अभिजीत मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

About The Author

error: Content is protected !!