महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाची स्थापना
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाची स्थापना करण्यात आली. मंडळाच्या अध्यक्षा म्हणून मोहिनी शशिकांत बनसोडे तर सचिव शुभम मोतीपवळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदस्य म्हणून स्नेहा नामवाड, प्रणाली कांबळे, नागेश पटवारी, श्रीकांत पंचगुडे, लक्ष्मी बिरादार, निकिता बिबिनवरे, अंजली कांबळे इत्यादींची निवड करण्यात आली.
मराठी वाङ्मय मंडळाच्या वतीने ‘साहित्यरत्न’ ही परीक्षा, शुद्धशब्दलेखन कार्यशाळा, काव्यलेखन कार्यशाळा, संदर्भ साहित्य ओळख कार्यशाळा, काव्यवाचन, कथाकथन व वाचन स्पर्धा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. कु. लक्ष्मी बिरादार, कु. प्रणाली कांबळे, कु.स्नेहा नामवाड व नागेश पटवारी यांचा युवक महोत्सवातील यशस्वी सहभागाबद्दल पाहुण्यांच्या हस्ते ग्रंथ भेट देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी नुतन मराठी वाङ्मय मंडाळाच्या पदाधिका-यांचाही सत्कार महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव डॉ.रामप्रसाद लखोटिया व उपप्राचार्य डॉ.राजकुमार मस्के यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ.दीपक चिद्दरवार यांनी केले. त्यांनी वाङ्मयमंडळाचा हेतू व उपक्रमाविषयीची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. तसेच प्रा.डॉ.बाळासाहेब दहिफळे यांनी वाङ्मय मंडळाचे महत्त्व व आवश्यकता प्रतिपादन केली. साहित्य जीवनात चैतन्य निर्माण करते. साहित्यातून संस्कार घडतात व सुसंस्कृत समाजनिर्मिती हे साहित्याचे कार्य आहे. साहित्यातून लोकशाही, मानवता व सत्यशोधक दृष्टिकोन वृद्धिंगत होतो असे प्रतिपादन प्रमुख व्याख्याते उपप्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी केले. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाङ्मय मंडळाच्या उपक्रमातून वाव मिळावा तसेच त्यांच्या भाषिक कौशल्यांचा विकास व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली, साहित्यातून मूल्यशिक्षणाचे धडे मिळतात, असे डॉ .रामप्रसाद लखोटिया यांनी अध्यक्षीय समारोपात प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.अर्चना मोरे यांनी केले तर आभार प्रा.डॉ.के.एस.भदाडे यांनी मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.
