भाषेचे ज्ञान वाढविण्यासाठी विश्वकोशाचा वापर आवश्यक – डॉ. मारोती कसाब

भाषेचे ज्ञान वाढविण्यासाठी विश्वकोशाचा वापर आवश्यक - डॉ. मारोती कसाब

अहमदपूर (गोविंद काळे) : मराठी भाषेची विश्वात ओळख लोकभाषा, ज्ञानभाषा, राजभाषा म्हणून आहे. ग्रामीण भागातील बोलींनीच मराठी भाषा समृद्ध केली असून, जोपर्यंत शेतकरी- कष्टकरी मराठी माणूस जिवंत आहे; तोपर्यंत मराठीचे अस्तिस्व कोणीही कमी करू शकत नाही. परंतु जागतिक स्पर्धामध्ये मराठी भाषा टिकवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी भाषेचे ज्ञान वाढविण्याकरिता विश्वकोशाचा उपयोग मराठी अभ्यासकांनी करावा असे प्रतिपादन महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवी तथा महात्मा फुले महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे सहयोगी प्रा . डॉ . मारोती कसाब यांनी केले .

येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने आयोजित ‘मराठी राजभाषा गौरव दिना ‘च्या कार्यक्रमानिमित्त प्रमुख मार्गदर्शन करतांना डॉ.मारोती कसाब हे बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी तथा हिंदी विभागातील प्रा . डॉ. पांडुरंग चिलगर हे तर उपप्राचार्य डॉ .दुर्गादास चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यांच्यासह आयोजक डॉ. अनिल मुंढे, डॉ. मारोती कसाब हे विचार मंचावर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना डॉ. मारोती कसाब म्हणाले की , विश्वाचे ज्ञान मराठी विश्वकोशात आहे त्या ज्ञानाचा उपयोग मराठी माणसांनी आपल्या ज्ञानाच्या वाढीसाठी करावा व मराठी वर्णमाले नुसार अ ते ज्ञ या क्रमाने संपूर्ण विश्वाची माहिती या ज्ञान ग्रंथात आहे, असेही ते म्हणाले .

यावेळी प्राचार्य डॉ वसंत बिरादार म्हणाले की,विश्वकोष हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारलेले बाळ आहे. महाराष्ट्राज्य साहित्य संस्कृती मंडळ व विश्वकषाची स्थापना करून दोन्हीचे अध्यक्षपद तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्याकडे दिले. ते१९८०पर्यंत अध्यक्ष राहिले. नंतर महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ व विश्वकोष वेगळे झाले.१डिसेंबर१९८०रोजी विश्वकोष खंडाची स्वतंत्र स्थापना झाली.तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नंतर मे. पु. रेगे, श्रीकांत जिचकार,रा.ग.जाधव आणि विजया वाड यांना अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला आहे.आत्तापर्यंत २० मराठी विश्वखंडाची निर्मिती झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘आविष्कार’ या भित्तीपत्रकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, डॉ. पांडुरंग चिलगर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनिल मुंढे यांनी केले तर सूत्रसंचालन कु.संजीवनी येडले हिने केले. आभार कु.पूजा देशमुख हिने मानले. या वेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author